(कुडाळ / वार्ताहर )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे-कडावल परिसरात दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे खालची पालववाडी) या तरुणीचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय 22, रा. धुरीवाडा-मठ, ता. वेंगुर्ले) याला पोलिसांनी रविवारी पहाटे ४ वाजता वेंगुर्ला मठ येथे ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३/१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्दे-कडावल मुख्य रस्त्यापासून सुमारे ७० मीटर अंतरावर असलेल्या ओढ्याच्या बाजूला दामिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शनिवारी ती महाविद्यालयातून परतत असताना ही घटना घडली. दामिनी तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ती महाविद्यालयाचा गणवेश परिधान करून गावात परतत होती. त्यानंतर सायंकाळी पावणेसहा ते सहाच्या दरम्यान वर्दे-कडावल रस्त्यालगत ओढ्याच्या परिसरात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दामिनीला हल्लेखोराने घटनास्थळीच सोडून पलायन केले.
हल्ल्याच्या वेळी मुख्य रस्त्यावर मोबाईलवर बोलत असलेल्या एका स्थानिक तरुणाला ओढ्याच्या दिशेने झटापटीचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने तातडीने रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना याची माहिती दिली. आवाजाच्या दिशेने धाव घेतलेल्या ग्रामस्थांना दामिनी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर वर्देचे सरपंच पालव आणि पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले.
घटनेनंतर काळा शर्ट घातलेला एक तरुण दुचाकीवरून वेगाने पळून जाताना काहींनी पाहिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयिताचा शोध सुरू केला. साहिल धुरी हा मृत दामिनीच्या महाविद्यालयातच शिकत असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली. पोलिसांनी शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी रात्री सुमारे अकराच्या सुमारास त्याच्या राहत्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. यावेळी आरोपीनं रक्तानं माखलेले कपडे पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दामिनीची वाट पाहत घटनास्थळीच दबा धरून बसला होता. महाविद्यालयातून एसटीनं प्रवास करून दामिनी आपल्या गावात उतरली आणि घरी जात असताना आरोपीनं तिचा रस्ता अडवला. त्यानं तिच्याकडे पुन्हा प्रेमाची मागणी केली; मात्र दामिनीनं त्याला नकार दिला. या नकाराचा राग मनात धरून आरोपीनं तिच्यावर धारदार शस्त्रानं सपासप वार केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. या गंभीर हल्ल्यात दामिनीचा जागीच मृत्यू झाला.
संशयित आरोपीला रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या हत्येमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार कोणते, याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सिंधुदुर्ग पोलीस करीत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या ओळखी, एकतर्फी प्रेम आणि नकार स्वीकारण्यास असमर्थ ठरण्याच्या प्रवृत्तीतून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांबाबत दामिनी पालव हिच्या हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे. कोणत्याही व्यक्तीला प्रेमसंबंध नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, नकार मिळाल्यानंतर हिंसक वर्तन करणे हा गंभीर आणि अक्षम्य गुन्हा आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


