(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केतनला न्याय मिळावा आणि खटल्यात प्रभावीपणे बाजू मांडली जावी, यासाठी त्यांच्या वडिलांनी निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. आता ही नियुक्ती झाल्याची माहिती केतनच्या वडिलांनी दिली असून, याबद्दल अग्रवाल कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे तब्बल ५,०५३ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात तपासाचा तपशील तसेच घटनेपूर्वी आणि घटनेनंतर करण्यात आलेल्या डिजिटल सर्चची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
लोहगड येथील या खून प्रकरणात सुरुवातीला अपघाताचा प्रकार समोर आला होता; मात्र त्यानंतर हा खून असल्याचे उघड झाले. या गूढमय प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने खटल्याच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
केतनच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. निकम यांच्या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त करताना, मुलाला न्याय मिळण्याच्या आशा वाढल्याची भावना अग्रवाल कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यांच्या मागणीनुसारच ही नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले आहे.


