(रत्नागिरी / वार्ताहर)
नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करून पाणी अडविणे, जिरविणे आणि त्याचे संवर्धन करण्यावर भर दिल्यास जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची भक्कम जोड मिळाल्यास या उपाययोजना अधिक परिणामकारक ठरतील, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित ‘जलसेवा संकल्प अभियान २०२६’ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधी जयंती, दि. २ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, कार्यकारी अभियंता विजय पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
एका दिवसात ३,५०० वनराई बंधारे उभारण्याचा विक्रम
जिल्ह्यातील भूजल पातळी वाढविण्यासह भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीला गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका दिवसात सुमारे ३ हजार ५०० वनराई बंधारे उभारण्याचा विक्रम रत्नागिरी जिल्ह्याने नोंदविला आहे. येत्या एका महिन्यात जिल्ह्यात १० हजारांहून अधिक वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
या बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य होणार असून, भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल. तसेच विहिरींमधील पाणीसाठ्यात सुधारणा होऊन उन्हाळ्यातही पाण्याची उपलब्धता टिकून राहण्यास हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.
महिला बचत गटाच्या जलनियोजनाची देशपातळीवर दखल
जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून ग्रामपंचायती, स्थानिक नागरिक आणि महिला बचत गटांच्या पुढाकाराने जलसंधारणाची कामे वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यातील ‘सावित्री महिला बचत गटा’ने केलेल्या पाणी नियोजनाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी नमूद केले.
सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याचे आवाहन
भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पाण्याचा पुनर्वापर (Recycling) करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी नियमांनुसार इमारतींमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यावर भर दिला जात आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अन्य कामांसाठी वापर केल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होऊ शकतो, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पाणी ही मर्यादित नैसर्गिक संपत्ती असून, तिचे संवर्धन करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि जलसंधारणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी २ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


