(चिपळूण /रत्नागिरी)
चिपळूण एमआयडीसी परिसरात अमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाच्या कथित बेकायदा ताब्याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली. या कारवाईत ३ ग्रॅम एमडीसदृश पदार्थ आणि सुमारे सात लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री खेर्डी एमआयडीसी परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डी एमआयडीसी येथील पी.डी. इन्फ्रा कंपनीसमोरील रस्त्याच्या बाजूला १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.२६ वाजण्याच्या सुमारास संशयित रोहिदास बाळ पवार (वय २८, रा. पिंपळी खुर्द, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा एमडी अमली पदार्थ बेकायदा ताब्यात बाळगताना आढळल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पाऊचमध्ये असलेले पांढऱ्या रंगाचे छोटे तुकडे व पावडरसदृश पदार्थ जप्त करण्यात आला. पिशवीसह या पदार्थाचे वजन तीन ग्रॅम असून त्याची किंमत १२ हजार रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. या कारवाईत एमएच ४६ डीझेड ७६८२ या नोंदणी क्रमांकाची मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची एर्टिगा चारचाकीही जप्त करण्यात आली. या वाहनाची अंदाजित किंमत सात लाख रुपये असून, अमली पदार्थ आणि वाहन मिळून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सात लाख १२ हजार रुपये आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस कायदा), १९८५ मधील कलम ८(क) आणि २१(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. संशयिताला १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३८ वाजता अटक करण्यात आली. पोलिसांच्या नोंदीनुसार, त्याच्याविरोधात यापूर्वीही चिपळूण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये चोरी, दरोडा आणि मारहाणीसह २०२४ व २०२५ मधील एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


