(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला (SIR) भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ करण्यात आली आहे. तसेच प्राप्त दावे, हरकती आणि बजावण्यात आलेल्या नोटिसांवरील निर्णयाची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या सुधारित प्रक्रियेत नोटीस बजावण्यात आलेल्या मतदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. नाव नकाशीकरणात नसल्यामुळे किंवा तार्किक विसंगती आढळल्यामुळे नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी आता बूथस्तरीय अधिकारी (BLO) भेट देणार आहेत. आवश्यक कागदपत्रे संबंधितांकडून घेऊन ती निवडणूक आयोगाच्या ‘ECINet’ प्रणालीवर अपलोड केली जातील. त्यानंतर संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून या कागदपत्रांवर निर्णय घेतला जाणार आहे.
प्रत्येक नोटीसधारकाला सुनावणीसाठी निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा सहायक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीत सुनावणी घेतली जाईल आणि शक्यतो ती ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास मतदाराच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला त्याच्या वतीने सुनावणीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. ऑनलाइन सुनावणीची सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.
एसआयआर प्रक्रिया पूर्ण झालेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही पुनरिक्षणादरम्यान किंवा त्यानंतर मतदार यादीत नाव राहून गेलेल्या पात्र व्यक्तींना सातत्यपूर्ण अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. यामध्ये तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचाही समावेश आहे. अशा मतदारांच्या नावनोंदणीसाठी संबंधित राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना विशेष मोहीम तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गरजू, बेघर, कामगार तसेच रात्रीच्या निवारा केंद्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना एसआयआर प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत, यासाठी पुरेशी मदत केंद्रे आणि विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दावे-हरकती दाखल करण्याची मुदत वाढवण्यासोबतच कागदपत्रे संकलन आणि सुनावणीची प्रक्रियाही मतदारांसाठी अधिक सुलभ करण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या बैठकींच्या कामकाजातही बदल करण्यात आले आहेत. बैठकींचे अजेंडे यापुढे आगाऊ वितरित केले जाणार असून, बैठकीचे इतिवृत्तही जारी केले जाणार आहे. अधिकाऱ्यांचे वार्षिक कामगिरी मूल्यमापन अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी आयोगाची मंजुरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयोगाच्या माहितीनुसार, बिहारसह २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर पूर्ण झाले आहे. उर्वरित टप्प्यांतील अंतिम मतदारसंख्या संबंधित अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे सुधारित वेळापत्रकात नमूद आहे.


