(गुहागर / रत्नागिरी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावाकडील घरांमध्ये वर्दळ वाढलेली असतानाच गुहागर तालुक्यातील वेळंब-गुरववाडी येथे घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. घराच्या कडी-कोयंड्याला, खिडकीला किंवा अन्य कोणत्याही भागाला तोडफोड न करता अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून पर्समधील तब्बल १ लाख ७१ हजार ४२ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत वेळंब, गुरववाडी येथील घरात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी पुनम गजानन गुरव (वय ३४) यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप आहे.
चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ३३.३९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० ग्रॅमची सोन्याची साखळी, सोन्याची आणखी एक साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याचे झुमके, दोन नथ, ३० ग्रॅमची चांदीची साखळी, १५ ग्रॅमची चांदीची साखळी, दोन चांदीच्या कमरेच्या साखळ्या, चांदीचे कडे तसेच ४ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, चोरी करताना घरातील कडी-कोयंडा, खिडकी किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी जबरदस्तीची तोडफोड झाल्याचे आढळून आलेले नाही, त्यामुळे चोरट्याने घरात प्रवेश नेमका कशा पद्धतीने केला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल झालेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य शहरांतून अनेक चाकरमानी कोकणातील मूळ गावी दाखल झाले असताना घरातील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घरात प्रवेशाचे कोणतेही स्पष्ट चिन्ह नसतानाही चोरी झाल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान गुहागर पोलिसांसमोर आहे.


