( मुंबई/सातारा )
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी दोन दिवसांपूर्वी सायन येथील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर फलटणसह त्यांचे मूळ गाव असलेल्या माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच माळशिरस तालुक्यातील डॉ. रुपनवर यांच्या गावातील नागरिकांनी फलटणकडे धाव घेतल्यामुळे फलटणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, नातेवाईक डॉ. रुपनवर यांचे पार्थिव घेऊन मुंबईहून फलटणच्या दिशेने येत आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तत्काळ अटक न झाल्यास डॉ. रुपनवर यांच्या पार्थिवावर उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला असल्याचे समजते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती. डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीला डॉ. मदने या दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी केले होते गंभीर आरोप
गेल्या महिन्यामध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधितांनी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव टाकून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. तो स्वतः माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करत होता. मात्र, डॉ. रुपनवर यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. यानंतर चिडलेल्या संबंधितांनी डॉ. रुपनवर यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली होती. वेळेची मर्यादा संपलेली असतानाही त्याने तात्काळ सर्टिफिकेट देण्याचा तगादा लावला. मात्र, डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी नियमांचे बोट धरत तातडीने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. त्यानंतर वरिष्ठांनी हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला फिटनेस सर्टिफिकेट दिले.
डॉ. रुपनवर यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, संबंधित लोकांवर कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य विभागातील वरिष्ठांनी त्यांच्यावरच कारवाई करत त्यांचे वेतन रोखले होते. या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. रुपनवर यांनी सोशल मीडियावर वरिष्ठांनी केलेल्या पिळवणुकीबाबत व्हिडिओ प्रसारित केला होता. मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करणार, असा उल्लेख त्यांनी या व्हिडिओमध्ये केला होता. तसेच काही लोकांची नावे त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नमूद केली होती. या प्रकरणाची तातडीने दखल घेत फलटण शहर पोलिसांनी डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीवरून प्रसाद कोंडे देशमुख याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी कुणाचे नाव घेतले होते?
माझा संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्ती प्रसाद कोंडे-देशमुख, असे डॉ. रुपनवर यांच्या तळहातावर लिहिलेला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवरील मानसिक ताण आणि कामाच्या परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळजनक दावे केले आहेत.
या प्रकरणातील आरोप आणि दावे अद्याप चौकशीअंती सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे.

