(मुंबई)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर आता त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. इंधन बचत आणि मर्यादित संसाधनांच्या जबाबदारीने वापराचा संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारी) थेट बुलेटवरून विधानभवनात एन्ट्री केली. मुख्यमंत्री बाईकवरून मंत्रालयात पोहोचल्याचे दृश्य पाहून मंत्रालय परिसरात एकच चर्चा रंगली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आलिशान गाड्यांचा ताफा आणि पारंपरिक व्हीआयपी एन्ट्रीला फाटा देत दुचाकीने प्रवास केला. त्यांच्या या अनोख्या आणि साधेपणाचा संदेश देणाऱ्या एन्ट्रीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार होते, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दुचाकीवरून विधानभवनात दाखल झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशवासियांना इंधन बचतीबाबत आवाहन केले होते. पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करून पर्यायी आणि ऊर्जा बचतीच्या साधनांचा वापर वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही मंत्र्यांनीही आपल्या ताफ्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला असून ते आज इलेक्ट्रिक कारने विधानभवनात दाखल झाले. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आपल्या ताफ्यात सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश केला आहे. संपूर्ण इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा असलेले ते राज्यातील पहिले मंत्री ठरले आहेत. तर काल मंत्री अतुल सावे हे तर मंत्रालयात पायी चालत आल्याने चर्चा रंगली होती.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी देखील ऊर्जा बचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यपालांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या शक्यतेचा आढावा घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये सुरक्षा व्यवस्थेचा पुनर्विचार करून आवश्यक त्या मर्यादेत वाहनांचा वापर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठवलेल्या पत्राद्वारे या सूचना कळवल्या आहेत. मर्यादित संसाधनांचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी शासन पातळीवर सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुलेट राइडची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून इंधन बचतीच्या संदेशासाठी त्यांच्या या कृतीचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे.

