(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा या संघटनेच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना तक्रारी निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा या संघटनेने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना राकेश किशोर नावाच्या एका माथेफिरू वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नाही तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थानाही जुमानत नाही. या घटनेचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून जाहीर करतो आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची आमची संघटना ग्वाही देते.
सदर माथेफिरू वकील हा सनातनी विचाराचा असल्याचे आम्हाला जाणवत आहे. त्यामुळे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो की, सदर माथेफिरू वकिलाला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी. तसेच पुढील पंधरा दिवसाच्या आत या वकीलावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून तालुका स्तरावर मोठ आंदोलन उभे राहू शकते. त्यानंतर या आंदोलनाद्वारे उमटणारे पडसाद व तीव्र प्रतिक्रिया याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. त्यामुळे आमचे तक्रारी निवेदन वरिष्ठ पातळीवर पोचण्याची व्यवस्था त्वरित करण्यात यावी. तसेच पुन्हा एकदा या घटनेचा आणि सदर वकिलाचा जाहीर निषेध करतो असे, निवेदनात बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा यांनी म्हटले आहे.
या निवेदनाप्रसंगी बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळ्याचे माजी अध्यक्ष मंगेश सावंत, सभापती रजत पवार, अध्यक्ष भाई जाधव,सचिव कुलदीप जाधव, सहसचिव प्रशांत मोहिते,सहसचिव संदेश पवार आदी उपस्थित होते.

