(पुणे)
गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मृतदेह अखेर सिंहगड किल्ला परिसरात आढळून आला. खोल दरीत अडकलेला मृतदेह अत्यंत धोकादायक परिस्थितीत रॅपलिंगच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८) असे असून ती मूळ नांदेड जिल्ह्यातील धनेगाव येथील रहिवासी होती. सध्या ती चिंचवड येथील बिजलीनगर भागात वास्तव्यास होती.
मनीषा २८ एप्रिलपासून बेपत्ता होती. तिचा मोबाईल, बॅग आणि वैयक्तिक साहित्य सिंहगड परिसरात सापडल्यानंतर कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाणे येथे हरवल्याची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाने २९ एप्रिल रोजी उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. मात्र अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे त्या दिवशी काहीही हाती लागले नाही.
३० एप्रिल रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सहाय्यक उपनिरीक्षक गिरे आणि प्रवीण ताकवणे यांच्यासह पथकाने तोफखान्याजवळील बुरुज परिसरात संशयास्पद हालचालींचा मागोवा घेतला. तपासादरम्यान तरुणीने बुरुजावरून दरीत उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रॅपलिंगद्वारे खोल दरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली. कृष्णा मरगळे यांनी विशेष धाडस दाखवत या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र रेस्क्यूदरम्यान मधमाशांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला. मृतदेहाजवळ ७ ते ८ पोळे असल्याने हालचालीदरम्यान मधमाशा आक्रमक झाल्या आणि पथकावर हल्ला चढवला. प्रतिकूल परिस्थितीतही जवानांनी धैर्य न सोडता आवश्यक साहित्य ठेवून सुरक्षित माघार घेतली. नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बॅकअप टीम पाठवून मृतदेह वर आणण्यात आला आणि प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. या मोहिमेत वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.
या घटनेचा पुढील तपास हवेली पोलीस करत असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

