(जळगाव)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडला असून, लग्न काही दिवसांवर आले असतानाच नवरीचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पाचोरा-भडगाव मार्गावरील बांबरुड महादेवाजवळ कारचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात नवरीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील शिखा बेलसरे हिचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. 8 मे रोजी तिचा विवाह होणार होता. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची पहिली पत्रिका देवा चरणी अर्पण करण्यासाठी बेलसरे कुटुंब नाशिक येथील सप्तशृंगी गडावर गेले होते. मात्र देवीचे दर्शन करून परतत असतानाच काळाने घाला घालत नवरी मुलीसह तिच्या चुलत वहिनीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे घडली.
देवदर्शन करून परतत असताना बांबरुड गावाजवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शिखा बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिखाचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. तर 8 मे रोजी लग्न होणार होते. लग्नाची पत्रिका वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी ती भाऊ शुभम बेलसरे आणि चुलत भाऊ सुनील मानकर, चुलत वहिनी यांच्यासोबत परतवाडा (जि. अमरावती) येथून स्विफ्ट डिझायर कारने गेली होती. गडावर देवीची पूजा करून ओटी भरली, वडिलांना फोनवरून दर्शन झाल्याची माहिती दिली… आणि परतीच्या प्रवासातच नियतीने घात केला.
लग्नासाठी सजलेला मांडव आणि आनंदाने भरलेले घर या घटनेनंतर शोकमग्न झाले आहे. काही दिवसांवर आलेल्या विवाह सोहळ्याऐवजी आता अंत्यसंस्काराची वेळ आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिखा आपल्या नव्या आयुष्याच्या स्वप्नात रमली होती, मात्र नियतीने वेगळाच खेळ खेळत तिचे स्वप्न अधुरेच राहिले. या अपघातामुळे तिच्या माहेर आणि होणाऱ्या सासरच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

