(पुणे / पिंपरी चिंचवड)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने गृहनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चिखली येथील सेक्टर-12 गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या 95 दिवसांत 14 मजली निवासी इमारत उभारून प्राधिकरणाने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. या कामगिरीची नोंद Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये करण्यात आली असून, अधिकृत प्रमाणपत्र आणि पदक देऊन पीएमआरडीएचा गौरव करण्यात आला.
यापूर्वी मार्च 2026 मध्ये 100 दिवसांत इमारत पूर्ण करून पीएमआरडीएने विक्रम केला होता. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि सातत्यपूर्ण कामाच्या बळावर अवघ्या एका महिन्यात हा विक्रम मोडत 95 दिवसांचे नवे लक्ष्य गाठण्यात आले. याआधी Larsen & Toubro (L&T) या कंपनीच्या नावावर 96 दिवसांत 12 मजली इमारत बांधल्याची नोंद होती, त्यालाही आता मागे टाकण्यात आले आहे.
या प्रकल्पात ‘प्रीकास्ट आरसीसी’ आणि ‘3-एस सिस्टिम’ (Safety, Strength, Speed) या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. सुमारे 9 हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम करत हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला. ‘झिरो लॅग शेड्युलिंग’मुळे प्रत्येक टप्प्यावर वेळेचे काटेकोर नियोजन करण्यात आले, तर फॅक्टरी-निर्मित प्रीकास्ट घटकांमुळे बांधकामाचा वेग वाढण्यासोबतच गुणवत्तेची एकसमानता राखली गेली आणि साहित्याची नासाडीही कमी झाली.
या यशामागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व तसेच महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले की, “मिशन 95 डेज” हे अत्यंत आव्हानात्मक उद्दिष्ट होते. मात्र प्रगत तंत्रज्ञान, काटेकोर अंमलबजावणी आणि 24 तास सुरू असलेल्या कामामुळे हे यश साध्य झाले.
B. G. Shirke Construction Technology यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही इमारत पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असून शाश्वत नागरी विकासाचे उत्तम उदाहरण मानली जात आहे. या प्रकल्पात एकूण 94,722 चौरस फूट क्षेत्रफळावर 14 मजली (डी-3) एलआयजी इमारत उभारण्यात आली असून, त्यामध्ये 112 दोन बीएचके सदनिका आहेत.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर कडक गुणवत्ता नियंत्रण, सुरक्षा मानके आणि डिजिटल पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे कमी वेळेत उच्च दर्जाचे बांधकाम शक्य झाले.
एकूणच, हा प्रकल्प केवळ विक्रमापुरता मर्यादित नसून भविष्यातील परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी एक आदर्श ‘स्केलेबल मॉडेल’ ठरणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कमी वेळेत, कमी खर्चात आणि उच्च गुणवत्तेत घरे उपलब्ध करून देण्यासाठी अशा तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची गरज अधोरेखित झाली आहे. पीएमआरडीएच्या या कामगिरीमुळे भारतातील बांधकाम क्षेत्रात वेग, गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाचा नवा मापदंड निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

