( रत्नागिरी /प्रतिनिधी )
आधुनिक भारताचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी बुद्धिस्ट पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित जलसा स्पर्धा २०२६ ला जिल्ह्यातील विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १२ जलसा मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, गुहागर आणि चिपळूण तालुक्यांतील मंडळांच्या सहभागामुळे आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
आंबेडकरी जलसा ही केवळ सांस्कृतिक परंपरा नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम राहिले आहे. बाबासाहेबांच्या काळातच आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते एकीकडे तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांवर भाष्य करत असताना, दुसरीकडे लोककलावंत आपल्या जलशातून समाजातील मनुवादी प्रवृत्तींविरुद्ध थेट बंड पुकारत होते. दादासाहेब पगारे यांनी शाहीर भीमराव कर्डक यांच्या ‘आंबेडकरी जलसे’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत १९४५ नंतर ही परंपरा काही काळ मंदावल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर वामनदादा कर्डक यांच्या रूपाने आंबेडकरी शाहिरीला नवी धार आणि जनमानसात नवे बळ प्राप्त झाले.
याच ऐतिहासिक परंपरेचा वारसा पुढे नेत या स्पर्धेत भीम संदेश कला झंकार मंडळ – धामणसे, प्रज्ञा कलामंच निकेतन आंबेडकरी जलसा मंडळ – करबुडे, माता रमाई जनसेवा संगीत जलसा मंडळ -तेरे, नवक्रांती जलसा मंडळ – दोडवली, महाराष्ट्र समता प्रवर्तक जलसा मंडळ – देव धामापूर, पंचशील जलसा मंडळ – चाफेरी, जनसेवा जलसा मंडळ – आगवे, म्हणून मी जागा आहे – आंबोली, मिलिंद जलसा कलानिकेतन – विल्ये, धम्म क्रांती जलसा मंडळ – संगमेश्वर, जनसेवा संगीत जलसा मंडळ – आंबव आणि आम्रपाली प्रबोधन कला मंच – मालगुंड हे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या पहिल्या बारा संघांना सहभागाची संधी देण्यात आली असून, जलसा स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा ग्रामीण भागात आजही आंबेडकरी विचारांची सांस्कृतिक पाळेमुळे घट्ट असल्याचे अधोरेखित करणारा मानला जात आहे. समता, न्याय, बंधुता आणि सामाजिक जागृतीचा संदेश लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याची ताकद जलशात असल्याने अशा उपक्रमांचे सातत्य टिकले पाहिजे, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम पारितोषिक म्हणून रोख रक्कम ₹११,१११ व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक म्हणून ₹७,७७७ व सन्मानचिन्ह, तर तृतीय पारितोषिक म्हणून ₹४,४४४ व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन संघांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील कलावंतांना प्रेरणा आणि प्रबोधनपर कलेला नवे बळ देण्याचा प्रयत्न आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
जलसा स्पर्धा पूर्णतः विनामूल्य; मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
आंबेडकरी जलसा ही केवळ लोककलेची परंपरा नसून समाजमनाला विचारांची दिशा देणारे प्रभावी प्रबोधन माध्यम आहे. समता, न्याय, बंधुता आणि मानवतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याची ताकद या कलाप्रकारात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही जलसा स्पर्धा पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रबोधनात्मक चळवळीला प्रतिसाद द्यावा. ग्रामीण भागातील कलावंत आपल्या सादरीकरणातून सामाजिक वास्तव, परिवर्तनाची हाक आणि प्रबोधनाचा स्वर मांडणार आहेत. नव्या पिढीनेही या परंपरेचा जवळून परिचय करून घेत समाजजागृतीच्या या प्रवाहात सहभागी व्हावे, हेच या उपक्रमामागचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


