(रत्नागिरी)
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२८ कोटी ५४ लक्ष इतका महसूल शासनास मिळवून देवून शासनाने दिलेल्या महसूल उद्दिष्टानुसार १०० टक्के पेक्षा जास्त महसूल वसुली केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उच्च्यांकी १२८ कोटी ५४ लक्ष इतका महसूल शासनास मिळवून दिलेला आहे. मागील वर्षीच्या १०५ कोटी ५० लक्ष महसूल वसूलीच्या तुलनेत या वर्षी भरघोस वाढ झालेली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतल्याने सदर उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. शासनाने दिलेल्या महसूल उद्दिष्टानुसार १०० टक्के पेक्षा जास्त महसूल वसूली कार्यालयामार्फत झाल्याने कार्यालयाचे कौतुक होत आहे.
प्राप्त महसूलापैकी सर्वाधिक महसूल वाहन नोंदणीतून प्राप्त झाला असून वर्षभरात ३४ हजार ५४० वाहनांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये दुचाकी २५ हजार ९०८, चारचाकी ४ हजार ७६१, ऑटोरिक्षा १ हजार ४६१, मालवाहू वाहने २ हजार ५५, प्रवासी वाहने १०७ व इतर यांचा समावेश आहे. तसेच आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्काद्वारे ३ हजार ५२९ वाहन धारकांकडून ३ कोटी ९४ लक्ष इतका महसूल प्राप्त झालेला आहे.
याव्यतिरिक्त कार्यालयाचे अंमलबजावणी पथकाद्वारे ५ हजार ८१४ इतक्या दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ३ कोटी ३३ लक्ष इतकी दंड वसूली करण्यात आली आहे.
परिवहन विभाग शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागांपैकी महत्त्वाचा विभाग असून दरवर्षी मोठया प्रमाणावर महसूल शासकीय तिजोरीमध्ये विभागाद्वारे जमा केला जातो. पुढील वर्षी देखील याप्रकारे कामगिरी करण्याचा कार्यालयाचा मानस आहे.

