(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपतीपुळे ते चाफे मुख्य मार्गावर असलेल्या महालक्ष्मी हॉल समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रत्नागिरीतील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार दिनांक 28 मार्च) रोजी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. राजेश मधुकर साळवी वय 56 वर्षे मुळ रा. फणसोप रत्नागिरी सध्या रा. रामरोड गणपतीपुळे असे त्यांचे नाव आहे.
याबाबत जयगड पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेश मधुकर साळवी हे चाफे ते गणपतीपुळे मार्गावर वॉकिंग करिता जात असताना सकाळी सव्वा सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने त्यांना ठोकर दिल्याने ते जागच्या जागी कोसळले. यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी ही घटना पाहिली असता तात्काळ सदर दिशेने धाव घेऊन अज्ञात वाहनाच्या धडकेत खाली पडलेल्या राजेश साळवी यांना ताबडतोब मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले.
या अपघातात अज्ञात वाहनाने राजेश साळवी यांना ठोकर दिल्याने जयगड पोलीस ठाण्याकडून सदर परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करून अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत घेण्यात येत आहे. या अपघाताच्या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड- गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

