(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गुहागर येथील श्रृंगारतळी बाजारपेठेतील सराफा दुकानात घरफोडीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून या प्रकरणातील चार आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण ११ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात घरफोडी व चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला होता. गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रृंगारतळी बाजारपेठेत असलेल्या ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३१ वाजता अज्ञात इसमांनी दुकानाचे बाहेरील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा क्रमांक ११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३३१ (४) व ६२ अन्वये घरफोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला. अखेर मुंबईतील घाटकोपर परिसरातून निशांत सुधीर आंबोकर (रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर), मोईन शकील शेख (रा. गोपाल भवन, घाटकोपर), सुमित कुलदीप चुनियाना (रा. कोहिनूर सिटी, कुर्ला) आणि आयुष जितेंद्र घागडा (रा. तानसा पाइपलाइन, लक्ष्मणनगर, घाटकोपर) या चौघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत ११,९५,२०० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.

