(मुंबई)
दिवाळीला एक महिना बाकी असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुट्या किती मिळणार? याबाबत उत्सुकता आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. यंदा विद्यार्थ्यांना 16 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत 12 दिवसांची दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र दरवर्षीपेक्षा सुट्ट्या कमी झाल्याने काही पालक व विद्यार्थी नाराज देखील आहेत. याआधी दिवाळीची सुट्टी जवळपास 21 दिवसांची दिली जात होती.
संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची माहिती
- दिवाळीची सुट्टी: 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर (12 दिवस)
- उन्हाळी सुट्टी: 25 एप्रिल ते 14 जून (44 दिवस)
- रविवारच्या सुट्ट्या: 53 दिवस
- सण-उत्सवाच्या सुट्ट्या: 67 दिवस
- पहिल्या सत्रातील परीक्षा: दिवाळी सुट्ट्यांपूर्वी
- दुसऱ्या सत्रातील परीक्षा: 8 ते 25 एप्रिल
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 129 दिवस सुट्ट्या असून, 220 दिवस अध्यापनाचे राहणार आहेत. यामध्ये रविवार, सण-उत्सव, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या यांचा समावेश आहे. यंदा उन्हाळी सुट्ट्या 25 एप्रिल ते 14 जून या कालावधीत राहणार आहेत. याआधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पहिला ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात होती, तर आता ती 8 ते 25 एप्रिल दरम्यान घेण्याचे आदेश दिले गेले आहेत.

