(राजापूर)
दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ४५ वर्षीय इसमाचा भाऊ व पुतण्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) दुपारी नाटे (ठाकरेवाडी) येथे घडली. मृत व्यक्तीचे नाव स्वप्नील ठाकरे (वय ४५, रा. नाटे, ठाकरेवाडी) असे आहे. या प्रकरणी संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाटे परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, स्वप्नील ठाकरे हे सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. १५ मे) ते आपल्या लहान मुलासह नाटे गावी आले होते. त्याच रात्री त्यांनी मोठा भाऊ चंद्रकांत ठाकरे व पुतण्यासोबत मद्यप्राशन केले. यावेळी तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. आज दुपारी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि रागाच्या भरात चंद्रकांत ठाकरे व त्यांचा मुलगा (स्वप्नील यांचा पुतण्या) यांनी स्वप्नील यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.