(राजापूर / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाटूळ येथील तीव्र उतारावर इनोव्हा कारने प्रवासी रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करणारी रिक्षा वाटूळ येथील उतारावरून जात असताना पाठीमागून वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारने (क्रमांक MP 41 ZA 0755) रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षातील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त रिक्षा राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.


