(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
साखरतर येथील रेहबर मोहल्ल्यात राहणारा २७ वर्षीय तरुण कामानिमित्त घरातून दुचाकीवरून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने त्याला अज्ञात कारणावरून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वदूद अस्लम कर्लेकर (वय २७, रा. घर क्रमांक ३४४, साखरतर, रेहबर मोहल्ला, रत्नागिरी) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वदूद हा ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून ज्युपिटर झेडएक्स मोरपीस रंगाची दुचाकी (क्रमांक एमएच ०८ ए डब्ल्यू १२६०) घेऊन रत्नागिरी येथे कामासाठी निघाला होता. मात्र, त्यानंतर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्याला पळवून नेऊन अपहरण केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
या प्रकरणी वदूद यांचे वडील अस्लम इस्माईल कर्लेकर (वय ५३) यांनी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१४ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


