घर बांधताना दिशा, जागा, खोल्यांची रचना आणि सजावट यांचा विचार केला जातो. मात्र वास्तुशास्त्राच्या पारंपरिक मान्यतेनुसार घरातील सर्वांत महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पहिला संपर्क याच ठिकाणाशी होतो. त्यामुळे प्रवेशद्वाराची दिशा, त्याची स्वच्छता आणि आसपासचे वातावरण यांना वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व दिले जाते.
वास्तुशास्त्राच्या मते घराचे प्रवेशद्वार म्हणजे केवळ ये-जा करण्याची जागा नसून घरातील सकारात्मक वातावरणाचे प्रतीक आहे. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित, स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवण्याची परंपरा अनेक भारतीय कुटुंबांमध्ये दिसून येते.
मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ का ठेवावा?
वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार मुख्य प्रवेशद्वाराजवळ अस्वच्छता, कचरा किंवा अनावश्यक वस्तूंचा पसारा ठेवणे टाळावे. प्रवेशद्वार स्वच्छ आणि मोकळे ठेवणे शुभ मानले जाते. यामागे केवळ धार्मिक किंवा वास्तुशास्त्रीय विचार नाही, तर व्यवहार्य कारणही आहे. घरात प्रवेश करताना परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असल्यास घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटते.
प्रवेशद्वाराजवळ अंधार असू नये
पारंपरिक वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाजवळ पुरेसा प्रकाश असावा, असे सांगितले जाते. अंधारलेला किंवा कायम सावलीत असलेला प्रवेशभाग टाळण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळी प्रवेशद्वारावर योग्य प्रकाश असल्यास घर अधिक सुरक्षितही राहते. त्यामुळे वास्तुशास्त्रातील ही सूचना व्यवहार्यदृष्ट्याही उपयोगी ठरते.
दरवाजासमोर अडथळे ठेवणे टाळा
मुख्य दरवाजासमोर मोठे कपाट, अनावश्यक सामान, कचरा किंवा सतत अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू ठेवू नयेत, अशी वास्तुशास्त्रीय धारणा आहे. घरात प्रवेश करताना मोकळी जागा असल्यास घर अधिक प्रशस्त आणि व्यवस्थित दिसते. त्यामुळे छोट्या घरातही प्रवेशद्वाराचा भाग शक्य तितका मोकळा ठेवणे फायदेशीर ठरते.
तुटलेल्या वस्तूंचे काय?
घरात तुटलेल्या खुर्च्या, बंद घड्याळे, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वापरात नसलेल्या वस्तू वर्षानुवर्षे साठवून ठेवण्याची सवय अनेक घरांमध्ये असते. वास्तुशास्त्रात अशा वस्तूंचा अनावश्यक साठा टाळण्याचा सल्ला दिला जातो. यामागे साधे कारण आहे. घरातील अनावश्यक वस्तू वाढल्या की जागा कमी होते, धूळ वाढते आणि घर अस्ताव्यस्त दिसू लागते. त्यामुळे वेळोवेळी घरातील न वापरण्यायोग्य वस्तू कमी करणे करणे चांगली सवय आहे.
प्रवेशद्वाराजवळ झाडे ठेवावीत का?
घराच्या प्रवेशद्वाराजवळ हिरवीगार झाडे किंवा कुंड्यांमधील रोपे ठेवणे अनेकांना आवडते. वास्तुशास्त्रातही काही प्रकारची हिरवाई सकारात्मक वातावरणाशी जोडली जाते. मात्र प्रवेशमार्ग पूर्णपणे झाकला जाणार नाही किंवा ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
दरवाजाचा आवाजही महत्त्वाचा?
काही ठिकाणी वास्तुचा मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना कर्कश आवाज होणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरात त्रास वाढतो. त्यामुळे दरवाजाचे बिजागर, कडी किंवा लॉक खराब असल्यास ते दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षातही सतत होणारा कर्कश आवाज त्रासदायक असतो.
घरातील वातावरणासाठी एक छोटी सवय
घर कितीही मोठे असो किंवा लहान, प्रवेशद्वारापासून घरातील वातावरणाची सुरुवात होते. त्यामुळे सकाळी घराची स्वच्छता करणे, खिडक्या उघडून हवा खेळती ठेवणे, नैसर्गिक प्रकाश घरात येऊ देणे आणि अनावश्यक वस्तूंचा साठा कमी करणे यामुळे घर अधिक प्रसन्न वाटू शकते.
वास्तुशास्त्राच्या पारंपरिक मान्यतांमध्ये यांना सकारात्मक ऊर्जेशी जोडले जाते. आधुनिक दृष्टीने पाहिले तर स्वच्छता, प्रकाश, हवा आणि नीटनेटकेपणा यांचा मानसिक आरोग्य आणि घरातील आरामावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वास्तुशास्त्रातील अनेक नियम हे परंपरा आणि श्रद्धांवर आधारित आहेत. त्यामुळे एखाद्या घरात एखादी दिशा किंवा रचना वेगळी असल्यामुळे नक्कीच संकट येईल, अशी भीती बाळगण्याची गरज नाही. घरात सुख-समाधान निर्माण करण्यासाठी परस्परांचे चांगले संबंध, स्वच्छता, सुरक्षितता, आर्थिक शिस्त आणि सकारात्मक वातावरण यांना सर्वाधिक महत्त्व आहे.
वास्तुशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर घराचा दरवाजा फक्त घर उघडत नाही, तर घरात येणाऱ्या वातावरणाचेही प्रतीक मानला जातो. म्हणून तो स्वच्छ, प्रकाशमान आणि मोकळा ठेवण्याची सवय नक्कीच चांगली.
टीप : वास्तुशास्त्रातील सूचना पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत.

