(पोलादपूर / शैलेश पालकर)
आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोकच्या खालील बाजूला आणि चिरेखिंड गावाच्या वरील मुख्य घाटरस्त्यालगत अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह काँक्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपामध्ये असल्याने या परिसरामध्ये दूर्गंधी पसरली होती. अधिक शोध घेता आंबेनळी घाटातील रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांना हा धक्कादायक प्रकार आढळून आला
महिलेच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविण्यात आली असून आंबेनळी घाटात ‘जळीतकांड’ झाल्याच्या या बुधवारच्या घटनेनंतर पोलादपूरकर हादरून गेले आहेत.
या घटनेची फिर्याद रस्त्याच्या कामाचा साईट सुपरवायझर अजित नथुनसाहा गुप्ता (वय 27 वर्षे, सध्या रा.कापडे बुद्रुक, ता.पोलादपूर, जि.रायगड मूळ रा.सुकरवलिया, ता.इटाठी, जि.बकसर, बिहार) याने पोलादपूर पोलीसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व महिला पोलीसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून परिसराची पाहणी केली असता अज्ञात आरोपीने अज्ञात महिलेला अज्ञात कारणाने जीवे ठार मारून पोलादपूर तालुक्यातील बावळीटोक गावाच्या हद्दीतील काँक्रीटच्या भिंतीमधील मोरीच्या पाईपामध्ये कोणतेतरी अतिज्वलनशील रसायनाने आग निर्माण करून तिचे प्रेत नष्ट करून तिची ओळख तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला तर तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी फोरेन्सिक टिमनेही परिसरासह मृतदेहाची फोरेन्सिक चाचणी केली.
या घटनेनंतर सोशल मिडीयावरून या महिलेल्या जळालेल्या प्रेताचे फोटो व्हायरल करून कोणाच्या परिचयाचे असल्यासअ पोलादपूर पोलीसांना कळविणे, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृत महिलेच्या जळलेल्या अवस्थेतील प्रेताच्या पायामध्ये चांदीची जोडवी असून हाताच्या बोटामध्ये पिवळया धातूची रिंग असल्याचे दिसून आले. मृतदेह ताठरता आलेल्या अवस्थेत असल्याने जाळण्यापूर्वीच महिलेचा खुन झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मागील काही दिवसांत रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचा आढावा घेतला जात आहे. तसेच मोबाईल लोकेशन, स्थानिक माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
गुन्हयाचा तपास पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे करणार असून पोलीस हवालदार कोंडाळकर यांनी गुन्हा र.नं. 18-2026 भारतीय न्याय संहिता 2023चे कलमख् 103 (1),238 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या वर्षी पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने तिच्या साथीदारासह चालत्या कारमधून एका व्यक्तीचा ओढणीने गळा आवळून ठार मारून त्याचे प्रेत कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सिमेंट काँक्रीटच्या भिंतीलगत फेकून पलायन केले होते. सदर प्रेताबाबतची फिर्याद भोगावच्या पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी 30 एप्रिल 2025 रोजी दिल्यानंतर वेगाने तपासयंत्रणा राबवित त्या प्रकरणात सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांनी दोन महिन्यांपासून फरार असलेल्या महिलेसह तिच्या साथीदाराचा तपास लावून अटक करीत यश मिळविले होते. आतादेखील अशाच प्रकारे महिलेला ठार मारून प्रेत सिमेंट काँक्रीटच्या भिंतीतील मोरीच्या पाईपामध्ये ज्वालाग्रही रसायन ओतून जाळण्याच्या या प्रकरणात तपासात यश येईल, अशी अपेक्षा आहे.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट, कशेडी घाट तसेच डोंगरदऱ्यांतील भागांमध्ये अशाप्रकारे खुन करून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार अनेकपर्षांपासून सातत्याने होत असल्याने येथे दिवसरात्र गस्तीपथक गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे.

