(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी महामार्गावरील निसर्गरम्य आरे-वारे समुद्रकिनाऱ्यालगत उपजीविकेसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्टॉल्सवर वन विभागाने जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने कारवाई केल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सुमारे २० ते २१ स्टॉल्स आणि त्यांना आधार देण्यासाठी करण्यात आलेली बांधकामे हटविण्यात आल्याने ऐन पर्यटन हंगामाच्या तोंडावर अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप बाधित व्यावसायिकांनी केला आहे.
आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या काही वर्षांत पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. या संधीचा आधार घेत स्थानिकांनी चहा, वडापाव, नारळपाणी, कोकणी खाद्यपदार्थ तसेच समुद्रात भिजून आलेल्या पर्यटकांसाठी आंघोळीची सुविधा उपलब्ध करून देणारे छोटे व्यवसाय सुरू केले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभारलेल्या या स्टॉल्समधून अनेक स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता. वाळूच्या भागात स्टॉल्सना आधार मिळावा यासाठी काही व्यावसायिकांनी चिरे आणि मातीचा भराव टाकून ओटेही बांधले होते. मात्र, पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर वन विभागाने याठिकाणी कारवाई केली. कारवाई अचानक झाल्याने दुकानांतील साहित्य सुरक्षितपणे हलविण्याची संधीही मिळाली नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहित्याचे नुकसान झाल्याचा आणि आर्थिक फटका बसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय अचानक बंद पडल्याने पुढील काळात कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
सुरूच्या वनक्षेत्रातील ट्री हाऊस प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वादातून झालेल्या निनावी तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. मात्र, या चर्चेला स्वतंत्र अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे कारवाई नेमकी कोणत्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे. आरे-वारे किनाऱ्यावर पर्यटकांच्या संभाव्य दुर्घटनांच्या वेळी स्थानिक व्यावसायिक मदतीसाठी धावून जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अशा परिस्थितीत पर्यटकांना सुविधा पुरविणाऱ्या स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्नही प्रशासनाने विचारात घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. कारवाईत वैभव वाडकर, शामल पारकर, अर्चना मयेकर, दीपाली मयेकर, नवज्योत मयेकर, संदीप मयेकर, वैभव मयेकर, रवी शिवलकर, रवी पारकर, उल्का बनप, विलास चौगुले, शितल शिवलकर, आशिष कनगुटकर, अजय बिर्जे, रणजीतसिंग मालगुंडकर, अमोल घाग, वैभव प्रकाश मयेकर, नरेश मयेकर, संगिता मयेकर, साहील मयेकर आणि प्रिती मयेकर यांच्यासह अनेक स्थानिक व्यावसायिकांना फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. यात विधवा महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचाही समावेश असल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे.
वन विभागाची भूमिका : नियमांनुसार बांधकामे हटविली
या कारवाईबाबत रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल विक्रम गुरव यांनी विभागाची भूमिका स्पष्ट केली. आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावरील वन विभागाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या झोपड्यांचे स्ट्रक्चर आणि ओटे दगडी बांधकाम करून पक्के केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार नियमानुसार संबंधित झोपड्या आणि बांधकामे हटविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, पूर्वसूचना न देता ऐन हंगामाच्या सुरुवातीला व्यवसाय हटविल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये असंतोष आहे. ‘आता जगायचे कसे?’ असा सवाल स्टॉलधारक वैभव वाडकर यांच्यासह बाधित व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.


