(मुंबई)
कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला दिला.
शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन ही मागणी ठामपणे मांडली. राज्यातील इतर बंद असलेल्या अंतर्गत गाड्यांचाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करताना मध्य रेल्वेने उत्तर भारतातील प्रवाशांसाठी गोरखपूरपर्यंत गाड्या सुरू केल्या; मात्र कोकणवासीयांसाठी अत्यावश्यक असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे कोकण पट्ट्यात नाराजी वाढली आहे. या संदर्भात सावंत यांनी यापूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊनही पाठपुरावा केला होता. लोकसभा अधिवेशनानंतर त्यांनी पुन्हा मध्य रेल्वेकडे धाव घेत मागणीला जोर दिला.
बैठकीला मध्य रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक अरविंद मालखेडे, भारतीय कामगार सेनेचे सहसरचिटणीस दिलीप जाधव, रेल कामगार सेनेचे पदाधिकारी भारत शर्मा, योगेश जाधव आदी उपस्थित होते.
राज्यांतर्गत गाड्यांवरही लक्ष केंद्रित करा
खासदार सावंत यांनी राज्यांतर्गत रेल्वे सेवांबाबतही नाराजी व्यक्त केली. मुंबई–सावंतवाडी ही गाडी आठवड्यातून एकदाच धावते, ती दररोज सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नांदेड–पुणे गाडी हडपसरपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा निर्णय अन्यायकारक असून ती पुणे स्थानकापर्यंत नेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मराठी प्रवाशांबाबत भेदभाव थांबवा’
मध्य रेल्वेच्या कामकाजात मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. ‘डेक्कन क्वीन’च्या वर्धापनदिनानिमित्त मराठीचा अभाव, ‘रेल वन’ अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश नसणे, तसेच काही गाड्या अंतिम स्थानकापर्यंत न नेता मधेच थांबवणे या मुद्द्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठी प्रवाशांविरोधातील अन्यायकारक भूमिका तात्काळ बदलावी,” असा इशारा त्यांनी दिला. याशिवाय रेल्वे जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि शिवडीतील ‘एंड-टू-एंड’ पुलाचे रखडलेले काम यांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
कोकणवासीयांच्या दैनंदिन प्रवासासाठी अत्यावश्यक असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर लवकरात लवकर सुरू होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

