(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात संगमेश्वर चौकात पुकारण्यात आलेल्या महामार्ग रोको आंदोलनात एका मातेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह थेट रस्त्यावर बसून शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. मुंबईहून आलेली मीना ही महिला कोणतीही भीती न बाळगता, आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन आंदोलनस्थळी ठामपणे बसलेली दिसून आली.
सकाळच्या थंड वातावरणापासून दुपारच्या कडक उन्हापर्यंत ही माता आपल्या बाळाला जवळ घट्ट धरून रस्त्यावरच ठाण मांडून होती. त्या चिमुकल्याच्या हातात जनआक्रोश समितीचा झेंडा होता. हे दृश्य उपस्थितांना अस्वस्थ करणारे असले तरी तितकेच विचार करायला लावणारे आणि प्रेरणादायी ठरले.
एका आईने आपल्या बाळाच्या सुरक्षित भविष्यासाठी महामार्गावर बसण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या धैर्याचे आणि निर्धाराचे प्रतीक बनला. “आम्हाला आमच्या मुलांचा जीव महत्त्वाचा आहे,” हा मूक संदेश तिच्या उपस्थितीतून स्पष्टपणे व्यक्त होत होता. या प्रसंगाने अनेक आंदोलक भावूक झाले, तर नागरिकांनी या मातेच्या धाडसाचे कौतुक केले.
या घटनेमुळे आंदोलनाला वेगळीच धार मिळाली. महामार्गाचे अपूर्ण काम, वाढते अपघात आणि प्रशासनाची उदासीनता याविरोधातील जनआक्रोश आई आणि बाळाच्या उपस्थितीने अधिक तीव्र झाला. नागरिकांना आपल्या चिमुकल्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागणे हे व्यवस्थेचे अपयश असल्याची भावना यावेळी प्रकर्षाने व्यक्त करण्यात आली.
संगमेश्वरातील हे महामार्ग रोको आंदोलन आता केवळ मागण्यांचे आंदोलन न राहता, शासनासाठी एक गंभीर इशारा ठरले आहे. मुंबई–गोवा महामार्गावर सुरक्षितता आणि कामाची गती कधी येणार, हा प्रश्न आता एका आईच्या नजरेतून प्रशासनाला विचारला जात आहे.

