(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील मानस कोंड येथील श्रीराम-हनुमान ग्रामस्थ मंडळाचे सचिव व कारभारी श्री. गणुजी हिरु फेपडे आणि मुंबई मंडळाचे सचिव श्री. भिकाजी हिरु फेपडे यांचा मध्यविभाग ग्रामस्थ मंडळ, फेपडे वाडी यांच्या वतीने ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिष्टचिंतन व समाजरत्न गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये एकतेचे दर्शन घडले.
सोहळ्याची सुरुवात वाडीतील ग्रामस्थ कै. तुकाराम सोमा फेपडे यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री. गणुजी फेपडे आणि श्री. भिकाजी फेपडे यांना “समाजरत्न” म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करताना सन्मानपत्र व मानचिन्ह अनुक्रमे माजी केंद्रप्रमुख श्री. दिगंबर बने गुरुजी आणि चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैदेही सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सत्कार स्वीकारताना दोन्ही मान्यवरांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली आणि आगामी पिढीला सामाजिक बांधिलकी जपण्याचे मार्गदर्शन केले.
सहकाऱ्यांचा आणि जेष्ठ माहेरवासीयांचा गौरव
सोहळ्यात सत्कार्मूर्तींच्या बरोबर त्यांच्या सहकाऱ्यांचा आणि जेष्ठ माहेरवासीयांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यामुळे सोहळ्याला एक वेगळी उब आणि सर्वसमावेशकता लाभली. अभिष्टचिंतन सोहळ्यास आंबेड ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच श्री. सुहास मयंगडे, वाडी प्रमुख गणपत दे. फेपडे, पोलीस पाटील सुनील शिगवन, तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक आणि माहेरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यअहवाल श्री. दिपक फेपडे यांनी सादर केला. त्यांच्या मांडणीत दोन्ही मान्यवरांच्या सामाजिक कार्याचा प्रवास, जबाबदाऱ्या, वाडीसाठी दिलेले योगदान आणि मुंबई-मराठवाड्यातील संघटनात्मक कामाचा सविस्तर आढावा घेतला गेला.
कार्यक्रमाचे निवेदन आदर्श शिक्षक श्री. विलास कानर गुरुजी यांनी प्रभावीपणे केले.
संपूर्ण कार्यक्रमातून दोन्ही समाजरत्नांचा गौरव केवळ व्यक्तींचा नाही, तर संपूर्ण वाडीचा आणि समाजाच्या कार्यपरंपरेचा सन्मान असल्याची भावना सर्व उपस्थितांच्या मनात उमटली.

