(पुणे / पिंपरी-चिंचवड)
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी विवाहासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रजेचे अर्ज सादर केले असून, त्यासोबत विवाहाची पत्रिकाही जोडल्याची माहिती आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे.
दोघींची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली होती. पोलीस सेवेत दाखल होण्याचं स्वप्न घेऊन दोघी पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या. भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर दोघी पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात होती. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात दोघींची एकाच ठिकाणी नियुक्ती झाली.
एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांच्यातील जवळीक वाढली. कालांतराने दोघींनी परस्पर संमतीने आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक महिला उत्तर महाराष्ट्रातील, तर दुसरी पुणे जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
या नात्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यापैकी एका महिलेच्या कुटुंबीयांनी या संबंधांना विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबीयांनी विवाहाला विरोध करण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याची माहिती आहे. मात्र, हा दोन्ही सज्ञान महिलांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विषय असल्याने प्रशासनाकडून विवाह रोखण्याऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशनाची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, दोघींनी विवाहासाठी अधिकृत रजेचा अर्ज साद केला असून, त्यासोबत लग्नपत्रिकाही जोडल्याची माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलीस दलात चर्चेत असलेलं त्यांचं नातं आता अधिकृतपणे समोर आलं आहे.
काय आहे समलिंगी विवाहाची कायदेशीर स्थिती?
दोन सज्ञान व्यक्तींना परस्पर संमतीने एकत्र राहण्याचा अधिकार असला तरी भारतात समलिंगी विवाहाला सध्या विषमलिंगी विवाहाप्रमाणे वैधानिक मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे खासगी पातळीवर विवाहविधी करण्याचा निर्णय आणि त्या विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणं या दोन वेगळ्या बाबी आहेत. विवाह नोंदणी, वैवाहिक अधिकार आणि सरकारी नोंदी याबाबत संबंधित कायदे आणि न्यायालयीन निर्णय महत्त्वाचे ठरतात. याच पार्श्वभूमीवर दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी नियोजित केलेल्या विवाहाबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांचा विवाह कायदेशीररीत्या नोंदवला जाईल की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
लिंगबदलानंतर सेवा नोंदीचा प्रश्नही चर्चेत
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील आणखी एका महिला कर्मचाऱ्याने शासनाची परवानगी घेऊन लिंगबदलाची शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. संबंधित कर्मचारी बीड येथून जिल्हा बदलीने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात दाखल झाली होती. शस्त्रक्रियेनंतर सेवा नोंदीत आपली लिंग ओळख पुरुष पोलीस कर्मचारी म्हणून नोंदवण्यात यावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्याने शासनाकडे केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलीस भरतीच्या वेळी महिला उमेदवार म्हणून मिळालेल्या सवलती आणि आरक्षणाचा विचार करता सेवा नोंदीत बदल करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे.
दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विवाहाचा निर्णय आणि दुसरीकडे लिंगबदलानंतर सेवा नोंदीत बदल करण्याचा प्रश्न यामुळे बदलत्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासमोर नवे कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. आता ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे नियोजित विवाह सोहळा पार पडतो का, कुटुंबीयांचा विरोध कशा प्रकारे हाताळला जातो आणि या प्रकरणाबाबत प्रशासनाची पुढील भूमिका काय असते, याकडे पोलीस दलासह सर्वांचं लक्ष लागलं आहे.

