(मुंबई)
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) महिला पर्यटकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर महिला पर्यटकांसाठी ही खास ऑफर असून, 1 ते 8 मार्च या कालावधीत महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी महिला पर्यटकांना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करणे आवश्यक आहे. यासाठी काही नियम आणि अटी आहेत. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी वैध असून, त्यांना त्यांचे ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना उपस्थित असणे अनिवार्य आहे. ही ऑफर कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. शिवाय यात नाश्त्याचादेखील समावेश नाही. या सवलतीअंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही. एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल. या ऑफरमुळे महिला पर्यटकांना राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.