(गुहागर)
उमराठ ग्रामपंचायत आणि ग्रामीण आरोग्य केंद्र हेदवी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी उमराठ आरोग्य उपकेंद्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हेदवी आरोग्य केंद्रातर्फे उमराठ आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, आरोग्य सेवक अजय हळये, आशा सेविका वर्षा गावणंग, रूचिता कदम व अंगणवाडी मदतणीस मयुरी गोरिवले तसेच ग्रामपंचायत उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर, उमराठ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, उमराठ प्राथमिक शाळा नं.१ चे मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर आणि अनिल अवेरे सर तसेच उमराठचे ग्रामस्थ शांताराम गोरिवले, गंगाराम गोरिवले, देवजी गोरिवले, अशोक जालगावकर आणि बहुसंख्य महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.
सुरूवातीला अनिल अवेरे सर यांनी आरोग्यवर्धिनी दिना संदर्भात प्रस्तावना केली तर आरोग्य सेवक अजय हळये यांनी आरोग्य विभागाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सुद्धा उमराठ आरोग्य उपकेंद्रात नव्याने रूजू झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे यांना ग्रामपंचायतीच्यावतीने आणि समस्त उमराठ ग्रामस्थांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्या नंतर समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे यांनी आरोग्यवर्धिनी दिन साजरा करण्या मागील आरोग्य विभागाची नेमकी ध्येये आणि उद्दिष्टे काय आहेत याचे विवेचन केले. क्षयरोग होण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्या वरील उपाय योजना, इत्यादी बाबतीत माहिती दिली. आरोग्यवर्धिनी दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे क्षयरोग आणि इतर कॅन्सर, डायबेटिस सारखे मानव जातीला घातक असणाऱ्या रोगांचे योग्य वेळीच निदान करून औषधोपचाराने निर्मुलन करणे आणि त्या बाबतीत मोठ्या प्रमाणात समाजात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे. यावेळी प्रदीप रामाणे आणि सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सद्याच्या युगात अशक्य असे काहीही राहिलेले नाही. असाध्य रोग सुद्धा योग्य वेळीच निदान करून औषधोपचाराने बरा होऊ शकतो. त्यासाठी आपली मानसिकता बदलायला हवी. या पुढे आपण सर्वांनी क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचार आणि प्रसार करून समाजाला रोगमुक्त होण्यासाठी आणि संतुलित निरामय जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया.
आरोग्यवर्धिनी दिनाचे औचित्य साधून हेदवी आरोग्य केंद्रातर्फे मोफत तपासणी शिबीराचे(NCD Camp चे) सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये (शिबीरात) २५ ग्रामस्थांनी वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला.
सदर आरोग्यवर्धिनी दिन साजरा करण्यासाठी हेदवी आरोग्य केंद्राचे डॉ. प्रतापराव गुजोंटे यांनी वैद्यकीय टिम पाठविल्याबद्दल तसेच उमराठ ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल सरपंच जनार्दन आंबेकर यांनी शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.