(मुंबई)
कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्याहून अधिक एस.टी. वाहतूक सुरु झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस.टी. महामंडळ प्रशासनाने दिली आहे.
२८ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील जवळपास ९२ हजार एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एस.टी. सेवा ठप्प झाली होती. दि. 8 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 644, रत्नागिरी जिल्ह्यातील आगारात 1 हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी संप सोडून कमावर हजर झाले आहेत.
कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल असे संबंधित आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.