(अदभुत / रंजक)
श्रीपुरम धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिर वेल्लूर(तामिळनाडू)मध्ये स्थित आहे. हे मंदिर वेल्लूर शहरातील दक्षिण भागात आहेत. या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास 15,000 किलोग्रॅम विशुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी त्या काळी 300 कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे.
मंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी असते. 100 एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चहूबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना वृत्ताकार आहे. मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘सर्व तीर्थम’ नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे. सोन्यापासून निर्मिती केलेले हे मंदिर बांधण्यासाठी 7 वर्षे लागले.
देशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून महालक्ष्मी मंदिर फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. काटपाडी स्टेशन वेल्लूर शहरातीलच एक भाग आहे.
24 ऑगस्ट 2007 रोजी हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसरात जवळपास 27 फूट उंच दीपमाळ आहे. मंदिर सकाळी 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत अभिषेकासाठी तर सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते. वर्षभर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. अनेकवेळा एक दिवसामध्ये एक लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी आलेले असतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर या दीपमाळेचे दर्शन घेणे आवश्यक आहे.