प्रत्येक भारतीय मनावर अधिराज्य गाजवणारी कोणी शूर वीरांगणा, पराक्रमी, राज्यकर्ती स्त्री असेल तर ती झाशीची राणी लक्ष्मीबाई होय. झाशीची सुरक्षा आणि स्वातंत्र्य यांना प्राधान्य देत स्वतः रणांगणावर जाऊन इंग्रजांना कडवी झुंज देणारी स्त्री म्हणजे राणी लक्ष्मीबाई होय.
राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव मणिकर्णिका मोरोपंत तांबे असे होते. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ साली उत्तर प्रदेश मधील वाराणसी या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव भागीरथी बाई तांबे असे होते. मणिकर्णिका अवघ्या चार वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते.
वडील मोरोपंत हे पेशव्यांच्या सेवेत असताना लक्ष्मीबाईंचे बालपण पेशवे घराण्यातच व्यतित झाले. लक्ष्मीबाईंनी तिथे शस्त्रविद्या, युद्धकला, धनुर्विद्या आणि घोडेस्वारी शिकली. त्यांच्या रोजच्या दिनचर्येत योगाभ्यास आणि घोडेस्वारी नेहमीच असायची.
लक्ष्मीबाई यांनी एकदा नानासाहेब पेशवे यांना घोडेस्वारीत हरवले देखील होते. नानासाहेब पेशवे यांनी लक्ष्मीबाई यांना तलवार, बंदूक, भाला चालवणे शिकवले. तसेच लक्ष्मीबाई यांना कुस्ती, मल्लखांब यांमध्ये देखील विशेष रस होता.
लक्ष्मीबाई यांचा विवाह वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे १८४२ साली दिनांक १९ मे रोजी उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. आता मणिकर्णिका या झाशी साम्राज्याची राणी लक्ष्मीबाई बनल्या होत्या. त्यांना दामोदरराव नावाचा पुत्र होता तर आनंदराव हा पुत्र त्यांनी दत्तक घेतला होता.
दामोदर या पोटच्या मुलाचे अवघ्या चार महिन्यांत निधन झाले. त्यानंतर दोन वर्षांनी गंगाधरराव यांचेही २१ नोव्हेंबर १८५३ साली आजारपणामुळे निधन झाले. सर्व दुःखातून सावरत राणी लक्ष्मीबाई यांनी राज्य कारभार स्वतःच्या हाती घेतला.
राणी लक्ष्मीबाई यांनी राज्याची सूत्रे स्वतःच्या हाती ठेवल्याने ब्रिटिश सरकारचा त्यांना विरोध होता. पोटचा वारस आणि पती हयात नसताना एखादी स्त्री राज्यकर्ती बनू शकत नव्हती असा कायदा असल्याने इंग्रजांनी झाशी हस्तगत करण्याचे ठरवले.
झाशीवर ईस्ट इंडिया कंपनीचा ताबा आल्यास येथील जनता पारतंत्र्यात जाईल अशा विचाराने राणी लक्ष्मीबाई यांनी सैन्य संघटन करण्यास सुरुवात केली. सर्व कायदे व नियम विरोधात असून देखील त्यांना स्थानिक राज्यकर्ते आणि लोकांचा विशेषकरून स्त्रियांचा मोठा पाठिंबा मिळाला.
१८५७ साली हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या कारण बंदुकीच्या गोळ्यांमध्ये डुकराची आणि गायीची चरबी वापरली जायची. त्यामुळे १८५७ साली संपूर्ण देशात विरोधाची एकच लाट उसळली होती. त्यावेळी ब्रिटिशांनी झाशी वर कोणताही दावा दाखवला नाही. परंतु १८५८ साली संपूर्ण ताकतीने आक्रमण करून झाशी ब्रिटिश सत्तेत सामील केली.
झाशी ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या ब्रिटीशांनी 7 मार्च 1854 ला सरकारी आदेश काढला, ज्यात झाशी राज्याला ब्रिटीश साम्राज्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राणी लक्ष्मीबाईंनी या आदेशाचे उल्लंघन करत “मै अपनी झांसी नही दुंगी” असे ब्रिटीशांना कळवले आणि त्यांच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र केला.
झाशी ताब्यातून गेल्याने तात्या टोपे आणि अन्य साथीदारांच्या मदतीने राणी लक्ष्मीबाई यांनी काल्पी आणि ग्वालियरसाठी लढा देत आपली कर्तबगारी दाखवून दिली. पेशवाई आणि राणी लक्ष्मीबाई हे मिळून राज्यकर्ते तर झाले पण ब्रिटिशांच्या तीव्र संघर्षाला सतत सामोरे जावे लागत होते.
१८५८ साली परतीच्या आक्रमणात काल्पी आणि ग्वालियर ब्रिटिशांनी हस्तगत केले, यामध्ये १७ जुन १९५८ रोजी किंग्स रॉयल आयरिश विरोधात राणी लक्ष्मीबाई यांनी युद्ध पुकारले होते आणि पूर्व क्षेत्रातील ग्वालियरचे नेतृत्व केले. परंतु या लढाईत त्यांना मृत्युने कवटाळले. ब्रिटिशांच्या घावाने १८ जून १८५८ रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या या बलिदानाला आमचा शतशः अभिवादन, या महान, पराक्रमी, शूर नेतृत्वास कोटी कोटी प्रणाम !