महाभारत युद्धामध्ये भीमाने दुर्योधनाचा लहान भाऊ दुःशासनचा वध केला.त्यानंतर भीमाने त्याची छाती फाडून रक्त पिले होते.ही गोष्ट सर्वांना माहिती असावी परंतु या घटनेशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत,ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात.आज आम्ही तुम्हाला महाभारताशी संबंधित अशाच काही रोचक गोष्टी सांगत आहोत.
भीमाच्या दातांपुढे गेले नाही दुःशासनचे रक्त…
महाभारतानुसार,युद्ध समाप्त झाल्यानंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले होते.दुर्योधनाला अन्यायपूर्वक मारल्यामुळे गांधारी खूप रागात होती. भीमाने गांधारीला सांगितले की-मी अधर्माने दुर्योधनाला मारले नसते तर त्याने माझा वध केला असता. गांधारीने विचारले की-तू दुःशासनचे रक्त पिले, ही गोष्ट सत्य आहे का?तेव्हा भीमाने सांगितले की-दुःशासनाने जेव्हा द्रौपदीचे जेव्हा केस पकडून तिला सभेत आणले होते तेव्हाच मी प्रतिज्ञा केली होती. जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली नसती तर क्षत्रिय धर्माचे पालन झाले नसते. परंतु दुःशासनचे रक्त माझ्या दातांच्या पुढे गेले नाही.
काळे पडले होते युधिष्ठिरचे नखं
भीमानंतर युधिष्ठिर गांधारीला भेटण्यासाठी गेले. गांधारी त्यावेळी खूप रागात होत्या. गांधारीची दृष्टी डोळ्यावरील पट्टीमधून युधिष्ठिरच्या पायांवर पडताच युधिष्ठिरचे नखं काळे पडले. हे पाहून अर्जुन श्रीकृष्णच्या मागे लपले आणि नकुल-सहदेवसुद्धा तेथून निघून गेले. थोड्यावेळाने गांधारीचा क्रोध शांत झाल्यानंतर पांडवांनी त्यांचा आशीर्वाद घेतला.
भीमाची हत्या करण्यास इच्छुक होते धृतराष्ट्र
गांधारीला भेटल्यानंतर पांडव धृतराष्ट्र यांना भेटण्यासाठी गेले. दुर्योधनाच्या मृत्यूनंतर धृतराष्ट्र यांना भीमाचा वध करण्याची इच्छा होती. भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी धृतराष्ट्र यांची गळाभेट घेताना भीमाची लोखंडाची मूर्ती समोर केली. धृतराष्ट्र यांनी लोखंडाच्या मूर्तीला भीम समजून ती मुर्ती आपल्या भुजांनी तोडून टाकली. त्यांना वाटले की भीमाचा मृत्यू झाला. धृतराष्ट्र यांचा क्रोध शांत झाल्यानंतर त्यांनी भीम जिवंत असल्याचे धृतराष्ट्र यांना सांगितले.
भीम करायचे राजा धृतराष्ट्रचा द्वेष
महाभारत युद्धानंतर युधिष्ठीर हस्तिनापुरच्या सिंहासनावर विराजमान होऊन धर्मपूर्वक शासन करू लागले. युधिष्ठीर दररोज धृतराष्ट्र आणि गांधारीचा आशीर्वाद घेऊनच इतर कामांना सुरवात करत होते. त्याचप्रकारे अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी हे सर्वजण धृतराष्ट्र आणि गांधारीच्या सेवेत उपस्थित होते. परंतु भीमाच्या मनामध्ये धृतराष्ट्रांबद्दल द्वेषभाव होता. कधीकधी भीम धृतराष्ट्रांसमोर कटू शब्द बोलत होते. अशाप्रकारे धृतराष्ट्र, गांधारी पांडवांसोबत 15 वर्षे राहिले. एके दिवशी भीम धृतराष्ट्र आणि गांधारीला खूप वाईट शब्द बोलून गेला. भीमाचे शब्द ऐकून धृतराष्ट्र आणि गांधारीला खूप दुःख झाले. त्यामुळे धृतराष्ट्र यांनी वानप्रस्थ आश्रमात (वनवास) राहण्याचा निश्चय केला.
असा झाला महात्मा विदुराचा मृत्यू
धृतराष्ट्र, गांधारी, कुंती वास्तव्यास असलेल्या ठिकाणी युधिष्ठिर त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. त्या सर्वांना पाहून युधिष्ठीरला खूप आनंद झाला आणि साधूंच्या वेशात आपल्या कुटुंबियांना पाहून दुःखही झाले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यानांही पांडवांना पाहून खूप आनंद झाला. तेथे विदुर न दिसल्यामुळे युधिष्ठीरने त्यांच्याविषयी धृतराष्ट्रांकडे विचारणा केली. धृतराष्ट्रांनी सांगितले की, ते कठोर तप करत आहेत. त्याचवेळी युधिष्ठीरला विदुर त्यांच्याकडे येत असल्याचे दिसले, परंतु आश्रमात एवढे लोक पाहून विदुर पुन्हा मागे फिरले. युधिष्ठिर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मागे धावले. तेव्हा एका झाडाखाली विदुर त्यांना उभे असलेले दिसले. त्यावेळी विदुरांच्या शरीरातील प्राण युधिष्ठीरमध्ये सामावला. (कारण महात्मा विदुर आणि युधिष्ठिर धर्मराज (यमदेव)च्या अंशातून जन्माला आले होते).
जेव्हा युधिष्ठिर धृतराष्ट्र यांना भेटण्यासाठी वनात गेले होते, तेव्हा आश्रमात महर्षी वेदव्यास आले होते. त्यांनी सांगितले की, युद्धामध्ये मारले गेलेले सर्व वीर आज रात्री तुम्हाला परत दिसतील. महर्षींनी सर्वांना रात्री गंगानदीच्या काठावर बोलावले. रात्र झाल्यानंतर महर्षी वेदव्यास यांनी सर्व वीरांचे आवाहन केले. थोड्यावेळाने भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन, अभिमन्यू, घटोत्कच, द्रौपदीचे पाच पुत्र इ. वीर बाहेर आले. आपल्या मृत परिजनांना पाहून सर्वांना आनंद झाला. सकाळ झाल्यानंतर ते सर्व वीर पुन्हा परत गेले आणि अशाप्रकारे ती अद्भुत रात्र समाप्त झाली.
कसा झाला होता धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीचा मृत्यू?
महाभारतानुसार, युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवांसोबत 15 वर्ष राहिले. त्यानंतर ते कुंती, विदुर आणि संजयसोबत तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेले. एके दिवशी गंगेत स्नान करून आश्रमात आले आणि त्याचवेळी अचानक आश्रमाला आग लागली. वृद्धावस्थेमुळे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती पळण्यास असमर्थ होते. यामुळे त्याची त्याच अग्निमध्ये प्राणत्याग करण्याचा विचार केला आणि एकाग्रचित्त होऊन तेथेच बसले. अशाप्रकारे धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीने प्राणत्याग केला.
@ यशवंत नाईक वॉल