(अदभुत / रंजक)
हे मंदिर भारतात सर्वात प्राचीन आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित विविध मान्यता असून यामधील काही खास गोष्टींची आज आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. या गोष्टी तुम्हाला वाचून नक्कीच नवल वाटेल. मात्र अशा रंजक व अनाकलनीय गोष्टींवर बालाजी देवस्थान व भक्तगण पूर्ण विश्वास ठेवतात…
- या मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत. असे मानले जाते की, या केसांचा कधीही गुंता होत नाही आणि हे नेहमी मुलायम राहतात.
- या मूर्तीला घाम कायम येतो. घामाचे थेंब स्पष्टपण दिसतात. तसेच पाठही घामाचे थपथपलेली असते, असे सांगितले जाते. म्हणजेच व्यंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो. भगवान व्यंकटेश्वराची पाठ कितीही स्वच्छ केली तरी तिथे नेहमीच ओलावा असतो आणि समुद्रासारखा आवाज कानावर पडतो. ध्यानपूर्वक कान लावून ऐकल्यास हा समुद्राचा आवाज ऐकू येतो.
- मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की, या छडीचा उपयोग देवाच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. यामुळे बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरु झाली.
- बालाजी मंदिरातील गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यास मूर्ती गाभाऱ्याच्या मधोमध दिसते, परंतु वास्तवामध्ये तुम्ही बाहेर उभे राहून पाहिल्यास ही मूर्ती गाभाऱ्यात उजव्या बाजूला स्थित असलेली दिसते.
- गुरुवारी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी हा लेप काढून टाकल्यानंतर मूर्तीवर देवी लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले असतात.
- मूर्तीवर अर्पण करण्यात येणारे सर्व फुले आणि तुळशीची पाने भक्तांना परत न देता, सर्व सामग्री बारीक करून मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीमध्ये टाकली जाते.
- मंदिरातील पुजारी दिवसभर मूर्तीवर अर्पण झालेली फुले मागे फेकत राहतात, अर्पण केलेल्या फुलांकडे पाहत नाहीत. कारण या फुलांकडे पाहणे चांगले मानले जात नाही.
- या मंदिरात एक दिवा हजारो वर्षांपासून प्रज्वलित असून हा दिवा कोणी लावला आणि केव्हापासून चालू आहे कोणालाही माहिती नाही. मंदिरात तेवत असलेला हा दीप कोणी प्रज्ज्वलित केला, याबाबतचे गूढ कायम आहे. या मंदिराच्या गर्भगृहात जळणारी बेटं कधीच विझत नाहीत, असं मानलं जातं की ही बेटे अनेक हजार वर्षांपासून जळत आहेत.
- असे म्हणतात की मंदिरात स्थापित केलेली वेंकटेश्वर स्वामींची दिव्य काळी मूर्ती कोणी बनवली नसून ही मूर्ती तीच आहे जी जमिनीतून प्रकट झाली होती.
- तिरुपती बालाजीची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी ठेवल्याचे दिसते पण तांत्रिकदृष्ट्या तसे नाही. मूर्ती प्रत्यक्षात मंदिराच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात ठेवली आहे.
स्थानिक मान्यतेनुसार, 18 व्या शतकात हे मंदिर 12 वर्ष बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात एका राजाने 12 लोकांना मृत्युदंड दिला आणि सर्वांचे शव मंदिरावर लटकवले होते. असे म्हणतात की, त्यावेळी व्यंकटेश्वर स्वामी प्रकट झाले होते. या मंदिरापासून 23 किलोमीटर अतंरावर एक गाव आहे. या गावामध्ये निवास करणारे लोकच फक्त गाभार्यात ये-जा करू शकतात. हे लोक कडक नियमांचे पालन करत जीवन व्यतीत करतात. याच गावामधून भगवान व्यंकटेश्वरासाठी फुल, दुध, तूप, लोणी इ. सामग्री आणली जाते.
श्री महालक्ष्मी आणि तिरुपती बालाजीची कथा –
कलियुगाच्या प्रारंभीही भगवान आदि वराह वेंकटद्री सोडून त्यांच्या कायमचे आराध्य दैवत वैकुंठाला गेले. त्यामुळे भगवान ब्रह्मदेव खूप चिंतित झाले आणि त्यांनी नारदांना काहीतरी करण्यास सांगितले, कारण भगवान विष्णूचा अवतार पृथ्वीवर व्हावा अशी भगवान ब्रह्मदेवाची इच्छा होती. त्यानंतर नारद गंगेच्या काठावर गेले जेथे ऋषींचा समूह गोंधळलेला होता आणि भगवान ब्रह्मा, भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये त्यांच्या यज्ञाचे फळ कोणाला मिळेल हे त्यांना ठरवता येत नव्हते.
यावर उपाय म्हणून नारदांनी भृगु ऋषींना तीन सर्वोच्च देवांची परीक्षा घेण्याची कल्पना दिली. भृगु ऋषींनी प्रत्येक देवाकडे जाऊन त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. परंतु जेव्हा ते भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांच्याकडे गेले तेव्हा दोघांनीही भृगु ऋषीकडे लक्ष दिले नाही, यामुळे भृगु ऋषी संतप्त झाले. शेवटी ते भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यानेही भृगु ऋषीकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे ऋषी संतापले आणि त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. क्रोधित असूनही भगवान विष्णूंनी ऋषींच्या पायाची मालिश केली आणि त्यांना दुखापत झाली का हे विचारले. याचे उत्तर भृगु ऋषींनी दिले आणि त्यांनी ठरवले की यज्ञाचे फळ नेहमीच भगवान विष्णूला समर्पित केले जाईल.
परंतु भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारण्याच्या या घटनेने माता लक्ष्मी क्रोधित झाली, भगवान विष्णूंनी भृगु ऋषींना शिक्षा करावी अशी त्यांची इच्छा होती, परंतु तसे झाले नाही. परिणामी तीने वैकुंठ सोडले आणि ती तपश्चर्या करण्यासाठी पृथ्वीवर आली आणि करवीरपुरा (आता महाराष्ट्रातील कोल्हापूर म्हणून ओळखले जाते) येथे ध्यान करू लागली. तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची अशी कथा असल्याची मान्यता आहे. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात. बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत, जो वर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही कथा आहे.
तिरुपती बालाजी देवस्थानात केस दान करण्याची कहाणी-
तिरुपती बालाजीमध्ये केस दान करण्याची परंपरा खूप जुनी आहे. हिंदू मान्यतेनुसार, हे दान देण्यामागचे कारण असे सांगितले जाते की भगवान व्यंकटेश्वर कुबेराकडून घेतलेले कर्ज फेडतात. ज्याच्याशी एक अतिशय मनोरंजक आख्यायिका संबंधित आहे. असे मानले जाते की, जेव्हा देवी लक्ष्मी पद्मावती म्हणून अवतरली आणि भगवान विष्णू वेंकटेश्वराच्या रूपात अवतरले तेव्हा भगवान वेंकटेश्वराने पद्मावतीशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मग एका परंपरेनुसार, वराला लग्नापूर्वी मुलीच्या कुटुंबाला एक प्रकारची फी भरावी लागत होती, परंतु भगवान व्यंकटेश्वर हे शुल्क भरण्यास असमर्थ होते, म्हणून त्यांनी संपत्तीचा देव कुबेर यांच्याकडून कर्ज घेतले आणि देवी लक्ष्मीशी लग्न केले. कलियुगाच्या शेवटी ते कुबेराचे सर्व ऋण फेडतील असे वचन दिले. त्यांनी देवी लक्ष्मीच्यावतीने देखील वचन दिले की, जो कोणी त्याचे कर्ज फेडण्यास मदत करेल त्याला लक्ष्मी देवी त्याच्या दहापट जास्त पैसे देईल. अशा प्रकारे तिरुपतीला जाणारे आणि भगवान विष्णूवर श्रद्धा ठेवणारे भक्त केस दान करून भगवान विष्णूचे ऋण फेडण्यास मदत करतात. असे केल्याने देव त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, असेही भक्त सांगतात.
ॐ नमो नारायणाय:
|| गोविंदा गोविंदा ||