(मुंबई)
पतीच्या बाहेरख्याली वागण्याला कंटाळून कल्याणमध्ये एका सिव्हिल इंजिनिअर महिलेने विष पिऊन आत्महत्या केली. प्रज्ञा सचिन मोरे (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या मुलीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती सचिन अनंत मोरे (४९, रा. दीपाली पार्क, वालिवली, बदलापूर) यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, सचिन मोरे याचे एका महिलेचे अनैतिक संबंध असल्याची माहिती प्रज्ञा मोरे यांना तीन वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये मिळाली होती. त्या महिलेशी संबंध ठेऊ नका, असे प्रज्ञा यांनी पतीला वेळोवेळी सांगितले होते. मात्र सचिन त्या महिलेच्या संपर्कात होता. त्या महिलेला आपण सोडू शकत नाही. तुला काय करायचे ते कर, तू जीव दे नाहीतर काही कर असे म्हणत ते पत्नीशी नेहमी वाद घालत होते.
अनैतिक संबंध असलेली महिलाही प्रज्ञा यांना संपर्क करुन मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून प्रज्ञा यांनी उंदीर मारण्याचे औषध पिऊन राहत्या घरात आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे.