(संगमेश्वर)
तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली किमान तीन महिन्यांनी सर्व खात्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत तहसील सभागृहात दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभा घ्यावी, अशी मागणी संगमेश्वर तालुका उत्कर्ष बहुविकलांग पुनर्वसन संघटनेच्यावतीने तहसीलदार साबळे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना उत्कर्ष संस्थेचे सभासद अमित देसाई, शिरगांवकर, विकास चव्हाण, लोहार, वाजे, माने यांच्यासह २५ सदस्य उपस्थित होते. दिव्यांगांचे अनेक प्रश्न विलास कदम व विकास सुर्वे यांनी उपस्थित करत त्यावर तोडगा काढला जावा अशी मागणी तहसीलदार साबळे यांच्याकडे केली आहे. तहसीलदार यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. अंत्योदय योजनेतील २१ हजार रुपयाची उत्पन्न मर्यादा वाढवावी. झाले नाही, तर अनेक गरजवंताना लाभ मिळणार नाहीत, असे संघटनेकडून सांगण्यात आले. देवरूख-पुणे एसटी स्लीपर बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिलांप्रमाणे दिव्यांगांनाही प्रवास सवलत मिळाली पाहीजे. सार्वजनिक बँका, कार्यालयात विकलांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प किंवा लिफ्ट सुविधा असली पाहीजे. काही महत्वाच्या कार्यालयात लिफ्ट नसल्यामूळे कामे करता येत नाहीत. केंद्र व राज्य शासन देत असलेली पेन्शन नियमित वेळेत मिळावी, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी साबळे यांनी तहसील कार्यालय पातळीवरील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू तसेच अन्य प्रश्न आपण त्या त्या विभागाकडे वर्ग करून सोडवण्यास सहकार्य करू, असे आश्वासन दिले. तत्पूर्वी संघटनेचे अध्यक्ष विलास कदम व संस्था सल्लागार माजी सभापती विकास सुर्वे यांनी तहसीलदार यांचे स्वागत केले.