हिवाळा सुरु झाला की,शरीरातील अनेक ब्याधी डोक वर काढायला सुरुवात करतात.त्याचप्रमाणे आपण थंडीत चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो.हिवाळा सुरू होताच आपली त्वचा कोरडी होत,चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येतात.तसचं चेहऱ्यावर कोरडेपणामुळे काही लोकांची त्वचाही काळी पडते. या समस्येचा सामना करण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. पण, तरीही त्याचा कोणताही परिणाम दिसत नाही. काही काळानंतर, त्वचा कोरडी होताच, ती पुन्हा काळी दिसू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या प्रोडक्टसचा वापर करण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय देखील करु शकता.
ज्याप्रमाणे काही घरगुती उपाय करून आपण उन्हाळ्यातलं त्वचेचं टॅनिंग कमी करू शकतो, त्याचप्रमाणे थंडीमुळे काळवंडलेली त्वचाही घरगुती उपायांनी पुन्हा उजळवता येते. काही अगदीच साधे सोपे घरगुती उपाय करून त्वचेचं काळेपण दूर करता येतं. यासाठी खूप जास्त वेळ देण्याचीही गरज नाही. केवळ ५ ते १० मिनिटांचा उपायही यासाठी पुरेसा ठरतो. घरगुती उपाय केल्यामुळे काळवंडलेली त्वचा तर उजळेलच, पण अधिक नितळ आणि तुकतुकीतही होईल.
गुलाब पाणी वापरा
चेहऱ्यावर नैसर्गिक टोन दिसावा म्हणून तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. तुम्ही त्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाकू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. यानंतर हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा. तुम्ही हात आणि पायांवरही लावू शकता. त्वचा मऊ करण्याबरोबरच मृत पेशी काढून टाकून ती चमकदार बनवण्यातही मदत होईल.
गरम पाण्याचा वापर कमी करा
थंडीच्या दिवसांत वातावरणात थंड असल्यामुळे आपण जास्त गरम पाण्याचा वापर करत असतो.दरम्यान अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. तसेच, चेहराही गरम पाण्याने धुतात. पण, यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा पण गरम पाण्याने चेहरा धुवू नका. दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचा चेहरा काळवंडू शकतो आणि कोरडेपणामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.
चेहऱ्यावर साबण लावू नका
चुकूनही चेहऱ्यावर साबण लावू नये. साबणातील रसायने त्वचेला वाईटरित्या नुकसान करू शकतात. चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचा लवकर कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक निघून जाते.
डेड स्किन काढून टाकण्यास विसरू नका
डेड स्किन काढून टाकल्याने त्वचा ताजेतवाने वाटते. त्यामुळे दररोज आंघोळीपूर्वी मृत त्वचा काढून टाका. यासाठी तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करू शकता. दह्यामध्ये पीठ मिसळून तुम्ही स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब लावा आणि चेहरा, मान आणि पाय हलक्या हाताने मसाज करा हे तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास आणि ती चमकण्यास मदत करतील.
कच्चे दूध
कच्च्या दुधात असलेल्या नैसर्गिक फॅट्समुळे हिवाळ्यात त्वचेला चांगले पोषण मिळते. तीन टेबलस्पून कच्चे म्हणजेच न तापवलेले दूध घ्या. यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस टाका. या मिश्रणाने त्वचेला ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्वचेचे काळवंडलेपण दूर होते. तसेच त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा.
हरबरा किंवा चणा डाळीचे पीठ त्वचेसाठी अतिशय पोषक असते. एक टेबलस्पून डाळीचे पीठ घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून दही टाका आणि एक टीस्पून हळद टाका. या मिश्रणाची चांगली पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावण्यापुर्वी चेहरा थोडा ओला करून घ्या. त्यानंतर हे पीठ चेहऱ्यावर चोळून लावा. १० मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर लगेचच चेहऱ्याला मॉईश्चराईज करा.
संत्र्यांच्या सालांची पेस्ट किंवा पावडर
संत्र्यांची वाळलेली साले मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पावडर करा. ही पावडर दूधात कालवा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा तजेलदार होईल. जर संत्र्यांची वाळलेली साले नसतील, तर संत्र्याचे साल बारीक बारीक चिरून घ्या आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करा. या पेस्टमध्ये थोडे दूध टाका आणि ती चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. त्वचेचा काळेपणा दूर होईल.
मसूर डाळीचे पीठ
मसूर डाळीचे पीठ देखील त्वचेचा काळेपणा घालविण्याचा एक उत्तम उपाय आहे. यासाठी दोन टेबलस्पून मसूर डाळीचे पीठ घ्या. यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून दही घाला आणि त्याची पेस्ट बनवा. चेहरा थोडा ओला करा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. २- ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. लगेचच फरक जाणवू लागेल.
चंदन
चंदन हे त्वचेसाठी अमृताप्रमाणे काम करते. जर चंदनाचं खोड असेल तर ते सहानीवर उगाळा आणि ते चेहऱ्याला लावा. हा उपाय करण्यासाठी चंदनाची पावडर वापरली तरी चालेल. चंदनाच्या पावडरमध्ये थोडं दूध टाका. त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय दर एक दिवसाआड केला तरी चालेल.
कोरफड जेल आणि आवळ्याचा रस
हे दोन्हीही घटक औषधी असून आयुर्वेदात आवळा आणि कोरफडीला बरेच महत्त्व आहे. उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले टॅनिंग कमी करण्यासाठी हा नैसर्गिक फेसपॅक अतिशय उपयुक्त ठरतो. एक चमचा आवळ्याचा रस आणि एक चमचा कोरफड जेल एकत्र करुन ते चेहऱ्याला लावा. १५ मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तुम्ही हा उपाय रोजच्या रोज केला तरी चेहऱ्याची त्वचा ग्लो करेल.
घरात सहज उपलब्ध असणारे हे घटक सौंदर्य खुलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपली त्वचा तेलकट असेल तर हे मिश्रण अतिशय उपयुक्त ठरते. या दोन्ही गोष्टी एकत्र करुन त्याची पेस्ट ५ मिनीटे बोटाने गोलाकार फिरवत चेहऱ्यावर लावा. १५ मिनीटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेचा ग्लो वाढण्यास निश्चित मदत होईल.
बटाट्याचा रस
बटाट्याचा रस त्वचेसाठी फायदेशीर असतो हे आपण अनेकदा ऐकले आहे. बटाटा किसून त्याचा रस काढून घ्यावा. हा रस चेहऱ्याला एकसारखा लावावा. यामुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी होण्यास मदत होते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने चेहऱ्यावरची डेड स्कीन निघून जाण्यास याची मदत होते. हा रस चेहऱ्याला लावताना मसाज करत लावल्यास तो त्वचेत मुरण्यास मदत होईल आणि टॅनिंग निघून जाईल.