(रत्नागिरी)
वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिक झाल्यावर अनेकदा काही मंडळी आपण आता वयस्कर झाल्याने स्वतःला कमकुवत समजतात, मात्र मी वयाच्या 93 व्या वर्षीही अगदी ठणठणीत असून जमेल तितकी समाजसेवा मी करीत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर यांनी केले.
आश्रय संघटना रत्नागिरी ही सुहेल मुकादम यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण केलेली संघटना असून गेली दोन वर्षे सातत्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही संघटना कार्यरत आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आश्रय संघटनेच्यावतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर चौके यांनी आपले आरोग्य कशाप्रकारे जपावे आणि काय काय खबरदारी घ्यावी याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपापले विचार मांडून सुहेल मुकादम यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले.
या कार्यक्रमात आश्रय संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद नागवेकर, शौकत काझी, सचिव अहमद मालवणकर, संस्थापक, सल्लागार सुहेल मुकादम, सल्लागार शकील गवाणकर सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक ज्यांनी समाजातील गोरगरीब जनतेसाठी जी सेवा दिली त्याबद्दल त्यांचा शाल, बुके, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार बाळ पाटणकर, तंटामुक्ती समिती गोळपचे अध्यक्ष एम.के.सुर्वे, मास्टर स्विमींग असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष गोपाळ बेंगलोरकर, शासकीय सेवानिवृत्त मुन्ना पठाण, रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रशीद मजगावकर, बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले हाजी अ.रहिमान बिजापुरी, हाजी इम्तियाज सय्यद, हाजी बशीर वस्ता, महादेव डोर्लेकर,असलम गवाणकर, कोअर कमिटी राजिवडाचे अध्यक्ष नजीर वाडकर, ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक, आशादीप संस्थेचे दिलीप रेडकर, नझीरुद्दीन वस्ता आदींचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडिअडचणी माझ्या कार्यालयात सांगाव्यात, आपण संबंधित कार्यालयातून त्या सोडवू असे आश्वासन सुहेल मुकादम यांनी दिले. या कार्यक्रमात शहर व परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक व पत्रकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.