(मुंबई)
म्हाडाची लॉटरी लागलेल्या गिरणी कामगारांसाठी चांगली बातमी आहे. म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. या लॉटरीत यशस्वी ठरलेले १४४ गिरणी कामगार तसेच त्यांचे वारसदार यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ५५ लाभार्थ्यांनी त्यांचे तात्पुरते देकार पत्र बँकेतून घेऊन जाण्याचे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे.
म्हाडाकडून मार्च २०२० रोजी ३८९४ सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत पात्र ठरलेल्या १३६९ गिरणी कामगार/वारसांपैकी १३३१ लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा करण्यासाठी तात्पुरते देकार पत्राची प्रत ऑनलाईन मोबाईलवर पाठविण्यात आली आहे. त्यापैकी सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रकमेचा पहिला हप्ता न भरलेल्या ११४ लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा पहिला हप्ता भरण्यासाठी ८ मार्च, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अद्याप तात्पुरते देकार पत्र प्राप्त न घेतलेल्या ५५ लाभार्थ्यांनी मूळ टोकन जमा करून बँकेतून तात्पुरते देकारपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे. सुमारे १२०० गिरणी कामगारांना तात्पुरते देकार पत्र बँकेतून घेऊन सदनिकेच्या विक्री किंमतीचा १० टक्के भरणा केला आहे.