रंजक : आपण आपल्या आवडत्या क्रिकेटपटुंना केवळ त्याच्या नावानेच ओळखत नाही तर, त्यांना त्याच्या नंबर वरुन देखील ओळखतो. मैदानावर उतरणारा प्रत्येक खेळाडू एका विशिष्ट नंबर घेऊन मैदानात उतरतो. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरील नंबर मागील रहस्य जाणून तुम्हाला खुप आश्चर्य वाटेल. आपण अनेकदा भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या जर्सीवर लिहिलेले क्रमांक पाहिले असेल. असे अनेकवेळा होते, की जेव्हा खेळाडू मैदानावर नसतो किंवा तो निवृत्ती घेतो, तेव्हा त्या क्रमांकाच्या जर्सीचा वापर इतर खेळाडू करतात. परंतु हे त्या खेळाडूंसाठी निराशाजनक असते. कारण त्यांना अशावेळी ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
जर्सीवरील नंबर फक्त संख्या नसून ती खेळाडूंची ओळख आहे. प्रत्येक खेळाडूचा जर्सी क्रमांक हा वेगळा असतो; पण आपल्या आवडत्या खेळाडूंच्या जर्सी क्रमांकाचा निर्णय कसा घेतला जातो किंवा कोणत्या खेळाडूला कोणता क्रमांक द्यायचा हे कोण ठरवतात, हे आपल्याला माहिती आहे का ? कदाचित आपणास आश्चर्य वाटेल पण या नंबर मागे एक रहस्य आहे. तसे, प्रत्येक खेळाडू आपला जर्सी क्रमांक निवडतो. त्या निवडीमागेही एक कारण आहे. जरी हा नंबर संघ व्यवस्थापन देत असले तरी, परंतु खेळाडू कोणतीही संख्या घेण्यास पूर्णपणे मोकळे असतात. जर तो नंबर इतर कोणत्याही प्लेयरकडे नसेल तर प्रत्येक खेळाडू हा नंबर त्यांच्या आवडीनुसार घेतो, म्हणूनच वीरेंद्र सेहवागच्या टी-शर्टवर तुम्हाला एकही नंबर पाहायला मिळणार नाही. अशा काही खेळाडूंच्या नंबर व त्याचे महत्व याची माहिती घेऊ.
सचिन तेंदुलकर- 10 नंबर हा सचिनच्या जर्सीच्या मागील बाजूस लिहिलेला आहे. यामागे कोणतेही खास कारण नाही, परंतु एकदा एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला की, त्यांच्या नावांमध्ये “10” येते, ‘Ten’ dulkar म्हणून त्याला 10 नंबर ची जर्सी आवडते. सचिन निवृत्त झाल्यानंतर बर्याच वर्षांनंतर भारताच्या शार्दुल ठाकूरने १० क्रमांकाची जर्सी परिधान केली. यामुळे सचिनच्या चाहत्यांना संताप आला आणि मग हा वाद वाढत जात असल्याचे पाहून शार्दुलने आपला जर्सी क्रमांक बदलला.
महेंद्र सिंह धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ऊर्फ माहीच्या जर्सीच्या क्रमांकाचे रहस्यच आहे. धोनीची 7 नंबरची जर्सी फेवरेट आहे. कारण, धोनीचा जन्म “7” तारखेला झाला आहे. महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस ७ जुलैला येतो. याशिवाय धोनीसाठी 7 नंबर खूप लकी आहे. याशिवाय फुटबॉल हे आणखी एक कारण आहे. सर्वांना ठाऊक आहे की, धोनीला फुटबॉल खूप आवडतो. त्याचा आवडता फुटबॉल खेळाडू रोनाल्डोदेखील ७ नंबरची जर्सी परिधान करतो. त्यामुळेच ७ नंबर तो स्वतःसाठी लकी समजतो.
विराट कोहली- विराट कोहलीची जर्सी नंबर 18 आहे. त्यामागे आहे एक खास कारण. विराट कोहलीच्या वडिलांचे 18 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यावेळी स्वत: विराट कोहली सुद्धा 18 वर्षांचा होता, म्हणून जेव्हा जेव्हा नंबर घ्यायचा असतो तेव्हा तेव्हा तो “18” नंबर घेतो. खरं तर या जर्सी क्रमांकासोबत भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हापासून कोहलीने कायमचा १८ नंबर स्वीकारला आहे.
युवराज सिंह- सलग सहा षटकार ठोकणार्या भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज युवराज सिंगने अनेक सामन्यांत आपल्या संघाला जिंकवले. टीम इंडियाच्या २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ मधील एकदिवसीय विश्वचषकातील विजयातील हीरोची जर्सी क्रमांक १२ आहे. खर तर युवराजशी 12 नंबरचे अनेक कनेक्शन आहेत. त्याचा जन्म १२ तारखेला आणि १२ व्हा महिन्यात झाला होता. इतकंच नाही तर त्याचा जन्म चंदीगड मधील सेक्टर 12 मध्ये झाला होता. आता तो या दुनियेत येताच हा आकडा घेऊन आला होता, ज्यामुळे १२ क्रमांकाला युवी लकी समजतो आणि या क्रमांकाची जर्सी घालतो.