(रंजक/अदभूत)
आज प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उत्तमोत्तम वास्तू जगभर उभारल्या गेल्या आहेत. पण काही वास्तू किंवा गोष्टी या अशाही आहेत ज्या कित्येक शतकांपासून अस्तित्वात आहेत आणि त्यांची उभारणी कशी केली गेली असेल किंवा निर्मिती कशी झाली असेल हा आजही एक संशोधनाचा विषय आहे. ही अद्भुत गोष्ट म्हणजे २० फुट उंच आणि १५ फुट रुंद असा एक पाषाण आहे. यात काही वेगळ वाटण्यासारखं नसावं. कारण आपण ट्रेकिंगसाठी फिरताना अनेक वेळेस मोठ मोठे पाषाण किंवा दगड वगैरे दिसतातच.
पण इथेच खरी गंमत आहे. जिथे आपला तर्क चालत नाही. कारण एवढ्या भव्य उंचीचा हा पाषाण आहे तब्बल २५० टनांचा आणि तो केवळ चार स्क्वेअर फुट इतक्याच जागेवर उभा आहे. या आश्चर्यात भर घालणारी अजून एक गोष्ट म्हणजे हा पाषाण एका नैसर्गिक उतारावर काही अंशाच्या कोनात उभा असून, सद्यस्थितीत तो गेली १२०० ते १३०० वर्ष उभा आहे. विविध बाजूंनी निरीक्षण केलं असता आणि विविध अंगांनी विचार केला असता हा नैसर्गिक चमत्कार म्हणावा असंच आहे. किंबहुना म्हणूनच याला पुरातन काळापासून एक नाव पडलेलं असावं ते म्हणजे ‘वान ईराई काल’ म्हणजे ‘अवकाशस्थ देवतांचा पाषाण’. काही जण याला ‘Krishna’s Butterball’ म्हणजे कृष्णदेवाच्या लोण्याचा गोळा असेही संबोधतात. तमिळनाडू मधील ममल्लापुरम येथे हा पाषाण गेली कित्येक शतकं कुतूहलाचा विषय बनला आहे.
जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे रहस्य आजपर्यंत कोणालाही समजू शकलेले नाही. असेच एक रहस्य तामिळनाडूतील महाबलीपुरम शहरात अस्तित्वात असलेला हा अतिशय प्राचीन दगड आहे, जो आश्चर्यापेक्षा कमी नाही. असे मानले जाते की हा दगड सुमारे १२०० वर्षे जुना आहे. असेही मानले जाते की श्रीकृष्णाने लहानपणी या ठिकाणी थोडेसे लोणी टाकले होते, ज्याने आता मोठ्या दगडाचे रूप धारण केले आहे. हा दगड पहिल्यांदा १९०८ मध्ये सापडला होता. असे म्हणतात की एकदा हा दगड बांधून तो खाली आणण्यासाठी सात हत्तींनी खेचले होते, परंतु हा दगड आपल्या जागेवरून हलला नाही. या ठिकाणी हा दगड मानवाने उभारला आहे की निसर्गाने, या प्रश्नाचे नेमके उत्तर आजतागायत मिळालेले नाही. दगडाचे गूढ अजूनही कायम आहे.
अनेक कथा आणि दंतकथा यांनी प्रसिद्ध झालेली पाषाणाभोवतालची ही जागा आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेली आहे. युनेस्कोतर्फे याला जागतिक हेरीटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे. चीनचे राष्ट्रपती क्षी जीन पिंग यांनी भारताला भेट दिली, त्या समयी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत या आश्चर्यास त्यांनी भेट दिली होती. असा हा नैसर्गिक चमत्कार जो गुरुत्वाकर्षणाचे नियम पुन्हा विचार करायला लावतो. त्याभोवती एक गूढ असं वलंय आहे, ज्यामुळे उत्तरोत्तर त्याच्या प्रसिद्धीत भरच पडते आहे. येत्या काळातही त्याच्या भोवती असलेल्या उत्सुकतेला काही उत्तर मिळेल का, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी एक ऐतिहासिक महत्व असलेलं पर्यटन स्थळ म्हणून तो नावारूपाला आला आहे आणि अचंब्याचा विषय ठरला आहे एवढ मात्र नक्की.