(मुंबई)
राज्यातील सर्वात सुंदर शहरांची यादी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराने पहिला क्रमांक मिळवला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहराने दुसरा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं कार्यक्षेत्र असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातर्फे शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा निकाल लावण्यात आला आहे.
नगरविकास दिनाच्या निमित्ताने मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी नगरविकास विभागाने शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दरवर्षी राज्यातील शहरांच्या सौंदर्यीकरण स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं. त्यासाठी राज्यातील प्रमुख शहरं तसेच महापालिका क्षेत्रांमध्ये स्वच्छता आणि इतर बाबींचं सर्वेक्षण केलं जातं. त्यानंतर गुणानुक्रमे राज्यातील सर्वात सुंदर शहरं कोणती, याची यादी जाहीर केली जाते. परंतु राज्यातील पहिली दोन शहरं ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्यामुळं त्याची सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे.