चेहरा गोरा आणि तजेलदार दिसण्यासाठी हे आहेत सोप्पे घरगुती उपाय प्रत्येकाला आपण सुंदर आणि गोरे दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण त्वचेचा रंग खुलण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रिम विकत घेऊन त्या वापरतात. मात्र सुंदर दिसणे म्हणजे काय तर सुंदर त्वचा असणे, त्वचा निरोगी राखणे. सुंदरतेचे मोजमाप रंगावरून करण्यापेक्षा त्वचा किती निरोगी आहे त्यावरून केले तर अधिक समर्पक ठरेल.
अनेकदा दूषित वातावरण, ऊन, किंवा योग्य देखरेख न मिळाल्यास रंग डार्क होत जातो आणि सुंदर त्वचा त्या डार्क त्वचेखाली लपून जाते. पण याहून मुक्ती मिळू शकते. मात्र केमिकल्सयुक्त क्रिममुळे चेहऱ्याचे अधीकच नुकसान होऊ शकते. आपला चेहरा गोरा कसा करायचा किंवा चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे, कोणती क्रीम वापरावी असे अनेकांचे प्रश्न असतात. यासाठी याठिकाणी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय दिले आहेत त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास, चेहरा गोरा होण्यास मदत होईल.
त्वचा काळी पडण्याची कारणे
१. ऊन – उन्हामध्ये जाण्यामुळे त्वचा काळवंडते. सूर्याची हानीकारक किरणे त्वचेचे वरील आवरण भाजून काढतात. त्यामुळे त्वचेचा रंग काळा पडतो. त्यालाच ‘सन टॅन’ असे देखील म्हणतात.
२. प्रदूषण – हवेतील प्रदूषणामुळे शरीराच्या उघड्या भागातील त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे चेहरा, मान, गळा, हात येथील त्वचा काळी पडते.
३. वात, कफ आणि पित्तदोष – आपल्या शरीरातील वात, कफ आणि पित्त ह्यांचे संतुलन बिघडले की निरनिराळे आजार होतात. त्यामुळे त्वचा निस्तेज होऊन काळवंडते. कोरडी पडते.
४. वाढते वय – वाढत्या वयाबरोबर त्वचेवरील चमक कमी होऊन तजेलदारपणा नाहीसा होऊ लागतो.
५. कॉस्मेटिकचा अतिवापर – चेहरा आणि त्वचेसाठी कॉस्मेटिक्सचा अति वापर केल्यास तात्पुरती तजेलदार कांती मिळते परंतु त्याचे कायमस्वरूपी परिणाम म्हणून त्वचा काळवंडू शकते.
६. स्थूलपणा – आवश्यकतेपेक्षा जास्त वजन असेल तर चेहरा, मान आणि गळा येथील त्वचा काळी पडू लागते. त्वचेचा पोत बदलून ती जाड होऊ लागते.
चेहरा गोरा करण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
1) टोमॅटो आणि काकडी – चेहऱ्याला चमक येण्यासाठी टोमॅटो आणि काकडी खूप उपयुक्त ठरते. यासाठी झोपण्यापूर्वी टोमॅटो किंवा काकडीचे काप करून चेहऱ्यावर काहीवेळ ठेवावे. यामुळे चेहरा गोरा व चमकदार होण्यास मदत होते.
2) बटाट्याचा किस – बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी. हा उपाय नियमित केल्यास चेहरा आणि मानेतील त्वचा गोरी होते व काळे डागही निघून जाण्यास मदत होते. बटाट्यामुळे चेहऱ्यावरील पुटकुळ्याही कमी होतात.
3) पपईचा गर – पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा व सुकेपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार व गोरा होण्यास मदत होते.
4) कोरपडीचा गर – कोरफडीचा गर (अॅलोव्हेरा जेल) चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप उपयुक्त ठरते. कोरफडीचा गर चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा, स्वच्छ आणि हायड्रेट होण्यास मदत होते. अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
5) अंड्याचा पांढरा भाग – अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर आणि काळ्या डागावर लावावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची त्वचा क्लीन होऊन काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते.
6) हळद आणि बेसन – बेसन, हळद आणि चंदन इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्यावी. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने हलका मसाज किंवा स्क्रब करत चेहरा धुवून घ्यावा. या फेस पॅकमधील सर्व आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात. हळद कच्च्या दुधात मिसळून चेहर्यावर लावल्यानेही काही दिवसातच आपल्याला उजळ त्वचा दिसू लागेल.
7) मसूर डाळ – मसूरडाळीच्या दोन ते तीन चमचे पिठामध्ये थोडे मध आणि नारळाचे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहरा सुंदर दिसण्यास मदत होते.
8) बेकिंग सोडा – चेहऱ्यावरील ग्लो वाढविण्यासाठी बेकिंग सोडा उपयोगी ठरतो. यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या. चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे लावावी. दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्यास चेहऱ्यावर असणारे डाग कमी होऊन चेहरा गोरा होण्यास मदत होते.
9) मध – चमचाभर मधात लिंबूरस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल. याशिवाय दररोज सकाळी अंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावावे व ते चेहऱ्यावर सुकू द्यावे. त्यानंतर अंघोळ करताना चेहरा धुवून घ्यावा. यामुळेही चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.
10) गुलाबजल – कापसाचे बोळे गुलाब पाण्यामध्ये भिजवून चेहऱ्यावर ठेऊन त्याद्वारे 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करावा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा तजेलदार बनतो.
11) लिंबू – लिंबू आपला रंग हलका करण्यासाठी व त्वचेला आतापर्यंत स्वच्छ करण्यात मदत करतं. हे आपल्याला त्वचेवरील डाग मिटवण्यास मदत करतं. लिंबाचा रस बेसन किंवा काकडीबरोबर मिसळून त्वचेवर लावावे.
12) बेसन – बेसन नॅचरल आणि प्रभावी फेसपॅकच्या रूपात वापरलं जाऊ शकतं. त्वचेप्रमाणे यात दूध किंवा दही आणि जराशी हळद मिसळून वापरावे. वाटल्यास लिंबू किंवा टोमॅटोचं रसही मिसळू शकता.
13) चंदन पावडर – चंदन पावडर किंवा चंदन घासून तयार केलेले पेस्ट, हे आपली त्वचा उजळ करण्यात मदत करेल. याने डागरहित उजळ त्वचा मिळू शकेल.
14) चारोळी – चारोळी दुधात घासून फेसपॅक तयार करावा. गोरा वर्ण प्राप्त करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. वाटल्यास यात गुलाबाची पानेही मिसळू शकता.
15) केळे – पिकलेले केळ दुधात कुस्करून त्याची पेस्ट तयार करून चेहरा अथवा त्वचेच्या काळवंडलेल्या भागावर लावावी. १५ ते २० मिनिटे ठेवून त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन टाकावी. टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
16) तांदूळ अथवा तांदळाचे पीठ – तांदूळ वाटून घेऊन किंवा तांदुळाचे पीठ घेऊन त्यात दूध आणि मध घालून पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट त्वचेवर चोळून लावावी. १५ मिनिटांनी साध्या पाण्याने धुऊन टाकावी. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा.
17) टोमॅटोचा रस – टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावावा. वाळला की साध्या गार पाण्याने चेहरा धुवावा. चेहऱ्यावरील काळसरपणा कमी होतो.
18) कच्चे दूध – उन्हामुळे भाजलेल्या त्वचेवर कच्चे, निरसे दूध दूध चोळून लावावे. १० मिनिटे ठेवून चेहरा धुवुन टाकावा. हा उपाय सनबर्नमुळे काळवंडलेल्या त्वचेवर फार लाभदायक आहे.
19) केशर – केशरामुळे रंग गोरा होतो हे तर सर्वश्रुत आहेच. दुधामध्ये केशराच्या तीन चार काड्या घालून त्या दुधाने चेहऱ्याला मालिश करावी. रंग उजळण्यास मदत होते.
20) दही आणि बेसन – दही आणि बेसन यांची पेस्ट बनवून त्यात चिमूटभर हळद आणि थोडी साय घालून हे मिश्रण चेहरा आणि हातापायांना लावावे. त्वचेचा काळसरपणा कमी होतो. दररोज अंघोळ करताना देखील या मिश्रणाचा वापर करता येतो.