(रत्नागिरी)
गेले अनेक महिने रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला लोकसभा निवडणुकीतच मुहूर्त मिळाला होता. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर घेण्यात येणार होती. तसे वेळापत्रक जाहीरही झाले होते. मात्र, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली.
वर्ग ३ व ४ च्या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी यातील काही संवर्गातील भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. त्यांनतर न्यायालयाने हा विषय निकाली काढून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती.
जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या १८ पदांच्या ७१५ जागांसाठी ७०,६०८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात ग्रामसेवक पदासाठी ४१ हजार अर्ज दाखल झाले होते. ३ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली होती. या भरतीत आरोग्य सेवकच्या दोन पदांसाठी ६४ अर्ज, आरोग्य परिचारिकेसाठी २२७ जागांसाठी ९३२ अर्ज, आरोग्य सेवक २२ जागांसाठी ४,८१५ अर्ज, आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी ५२ जागांसाठी १,०५० अर्ज, औषध निर्माण अधिकारीच्या ३७ जागांसाठी ४,१९९ अर्ज, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३ जागांसाठी ५६४, विस्तार अधिकारी कृषी ४ जागांसाठी ८११, वरिष्ठ सहायक लिपिक एका जागेसाठी २९९ अर्ज, पशुधन पर्यवेक्षक ४२ जागांसाठी १,२८६ अर्ज, कनिष्ठ आरेखक २ जागांसाठी ६१ अर्ज, वरिष्ठ सहायक लिपिक ६८ जागांसाठी ११,०४१ अर्ज, पर्यवेक्षिका ९ जागांसाठी १,५४८ अर्ज, कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा ३१ जागांसाठी १,५५७ अर्ज, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक २२ जागांसाठी ७४४ अर्ज, लघुलेखक उच्च श्रेणी १ जागेसाठी ११७ अर्ज दाखल झाले होते.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार असून, १ जुलैला मतमोजणी होणार आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.