(मुंबई)
तब्बल दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा निकाल अखेर शुक्रवारी लागला. या निवडणुकीतील १० पैकी १० जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेने भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) सपशेल धुव्वा उडवला. या अभूतपूर्व विजयासोबत युवासेनेने २ आठवड्याआधीच विजयादशमी साजरी केली.
याआधी सिनेट निवडणुक २२ सप्टेंबर रोजी होणार होती, परंतु २० सप्टेंबरला विद्यापीठाने अचानक परिपत्रक काढत ही निवडणूक स्थगित केली होती. या निर्णयाला युवासेनेने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने स्थगिती रद्द करीत २४ सप्टेंबर रोजी निवडणूक घेऊन २७ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. युवासेना आणि अभाविप यांच्यात सरळ सामना असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकार पराभवाच्या भीतीने सिनेटची निवडणूक घेण्यात अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप युवासेनेकडून करण्यात येत होता.
नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर राखीव जागेवरील अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गातून ३, महिला प्रवर्गातून २ अशा एकूण १० जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी खुल्या आणि राखीव प्रवर्गाच्या प्रत्येकी ५ अशा दहाही जागांवर ठाकरे गटाच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. ३८ मतदान केंद्रे आणि ६४ बूथ सिनेट निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई विद्यापीठ परिसरात ३८ मतदान केंद्रे आणि ६४ बूथ तयार करण्यात आले होते. मतदानाचे नियोजन करण्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे
महाराष्ट्र स्टुडंट युनियनने सिनेट निवडणूक स्थगित करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, परंतु या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर याचिका मागे घेण्यात आली.