(रत्नागिरी)
हॉटेलच्या टेरेसवर मोबाइलवर बोलत असताना तोल जाऊन खाली पडून लातूर येथील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (८ एप्रिल) गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे मध्यरात्री घडली. पुंडलिक नामदेव भुसे (३५, मूळ रा. गणेशवाडी शिरुळ अनंतपाल, लातूर, सध्या रा. गणपतीपुळे, रत्नागिरी) असे या कामगाराचे नाव आहे.
पुंडलिक भुसे हे सोलर पॅनलच्या दुरुस्तीसाठी ते लातूरहून गणपतीपुळे येथे आले होते. ते सोमवारी मध्यरात्री १२:३० वाजता ते गणपतीपुळेतील गणेशकृपा डिलक्स हॉटेलच्या टेरेसवर गेले होते. टेरेसवर ते कठड्यावर बसून मोबाइलवर बोलत होते. बोलता-बालता तोल गेल्याने ते अचानक खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
ही बाब त्याच्या सहकाऱ्यांच्या तसेच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लातूरमधून कामासाठी आलेल्या कामगाराचा असा मृत्यू झाल्याने परिसरात याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे