(चिपळूण)
पुण्याहून येथे गांजा आणून विक्री करणाऱ्या तालुक्यातील पिंपळी येथील तरुणाला पोलिसांनी रविवारी सायंकाळी ६:३० वाजता ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून ६०,६०० रुपये किमतीचा एक किलो गांजा जप्त केला आहे. त्याला सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
रोहिदास बाबू पवार (२८, रा. पिंपळी, चिपळूण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहिदास पवार हा गांजा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. अशातच त्याच्याकडे गांजा असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पवार याने हा गांजा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील रस्त्याच्या ठिकाणी एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला होता. रविवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.
त्याची प्राथमिक चौकशी केली असता विक्रीसाठी आणलेला गांजा पुण्यातून मिळविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुण्यातून नेमका कोठून आणला याची चौकशी सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विलास जाधव, पोलिस उपनिरीक्षक अरुण जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, रोशन पवार, प्रमोद कदम, संकेत गुरव, महिला पोलिस किरण चव्हाण यांच्या पथकाने केली.