( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के हे एक प्रयोगशिल चित्रकार आहेत. त्यांनी विविध माध्यमात केलेले काम पाहून चित्रकारांनी त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. कॅनव्हास वरील चित्राबाबत केवळ बोलायचं नसतं, तर समोरील चित्रं फक्त अंतर्मनातून पाहायचं असतं, असं मत प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरीत कोकणच्या सावर्डे येथील प्रसिद्ध चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन आज प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात कोलते हे बोलत होते. यावेळी जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक वसंत सोनवणी, चित्रकार प्रकाश भिसे, अरविंद हाटे, उद्योजक श्री.आणि सौ. पालकर, युगंधरा राजेशिर्के, मानस राजेर्शिके, शिल्पकार म्हापणकर, चित्रकार मेघा राजेशिर्के, विष्णू परीट, मनोज सकळे, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, रुपेश सुर्वे, अमित सुर्वे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चित्रकार कोलते पुढे म्हणाले की, राजेशिर्के यांचे या वयात कामाचे जे सातत्य आहे, ते अनुकरणीय तर आहेच शिवाय त्यांना उत्साही ठेवणारे आहे. जवळपास विविध बारा माध्यमात काम करणं हे सहज शक्य होत नाही. जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक वसंत सोनवणी म्हणाले की, मुंबईतून सावर्डे येथील ग्रामीण भागात जावून राजेशिर्के यांनी मौलिक अशी कलानिर्मिती केली. त्यांच्या कलाविष्काराचे भव्य रुप आज जहाँगीर कलादालनात पाहायला मिळत आहे. युगंधरा राजेशिर्के यांनी आपल्या मनोगतात नमूद केले, की कलाकाराची पत्नी होणं म्हणजे मोठी तारेवरची कसरत असते.
चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के आपल्या मनोगतात म्हणाले की, आपण विविध प्रकारच्या बारा माध्यमातून काम केलं आहे. मी ज्या वेळी निसर्गात जातो, त्यावेळी निसर्गाचे निरीक्षण केल्यानंतर निसर्ग आपल्या जवळ संवाद साधू लागतो. हळूहळू हा निसर्ग कॅनव्हासवर आपल्या कुंचल्यातून दृष्य रुप धारण करु लागतो. आपण निसर्गाकडे संवेदनशील नजरेने पाहायला पाहिजे असे राजेशिर्के यांनी नमूद केले. सदरच्या प्रदर्शनात प्रकाश राजेशिर्के यांच्या विविध माध्यमातील ७० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन ६ जानेवारी पर्यंत कलारसिकांसाठी खुले आहे. प्रदर्शनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी दोन कलाकृतीची विक्री झाली.