(संगमेश्वर)
मुंबई गोवा हायवेच्या उभारणीचे काम गेली अनेक वर्षे चालू आहे. संगमेश्वर नजिक निढळेवाडी येथील खोदकाम माहे नोव्हेंबर 2022 मध्ये केले गेले. त्यामध्ये येथील वापराची पाखाडी नष्ट झाल्याने स्थानिकांचे फार हाल होत आहेत. त्याचवेळी ग्रामस्थांनी सा. बां. अधिकाऱ्यांची संगमेश्वर शासकीय वसतीगृहात भेट घेतली असता, का. अ. जाधव साहेब यांनी तातडीने संरक्षक भिंत बांधून आतून पाखाडी करून देऊ सांगितले होते. तथापि त्यानंतर 7 – 8 महिने कोणतीही कार्यवाही न झाल्याने दिनांक 1 जुलै 2023 रोजी देवरुख येथे झालेल्या पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या जनता दरबारमध्ये सरपंच समीर जट्यार यानी गाऱ्हाणे मांडले होते. शिवाय दि. 07.08.2023 कार्यकारी अभियंता यांना पाहणी करून कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्यांनी लेखी आदेश दिले होते. याव्यतिरिक्त उपविभागीय अधिकारी तथा सक्षम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 भूसंपादन यानी त्यांचे दिनांक 28.07.2023 चे पत्राने पाखाडी बांधकामाबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जवळपास 650 – 700 लोकवस्तीचे गावातील जनतेसाठी पाखाडी बांधकामासाठी वस्तीपासून हायवे पर्यंत चार गुंठे जमीन सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी श्री. प्रभाकर वाडकर यांनी मोफत उपलब्ध करून दिली होती. त्याचप्रमाणे प्रस्तुत हायवेसाठी तीन गुंठे जमीन शासनास दिली होती. आज तेच अमृत ज्येष्ठ नागरिक असलेले गृहस्थ घरातून हायवेवर कसे जायचे या विवंचनेत आहेत.
पालकमंत्री वा प्रांत आॅफिस यांच्या सुचनांनंतरही कार्यवाही न झाल्याने दिनांक 06.11.2023 रोजी तत्कालीन मा. नामदार रविंद्रजी चव्हाण यांच्या हायवे पाहणी दौऱ्यात श्री. प्रभाकर वाडकर यानी सरपंच श्री. समीर जट्यार यांचेसह हाॅटेल सनराइज धामणी येथे मंत्र्यांना समक्ष पाखाडी व संरक्षक भिंत मागणीचे निवेदन दिले. कार्यकारी अभियंता श्री. जाधव साहेब यानीही स्वतः काम तातडीने सुरू करून पुर्ण करू असे आश्वासन दिले होते. यानंतरही सहा सात महिन्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पुन्हा पावसाळा जवळ आला तरी बांधकाम खात्याकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने दोन-दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या लेखी आदेशांचेही पालन होत नसेल तर आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे जाण्यावाचून पर्याय नसल्याचा सूर ग्रामस्थांमध्ये उमटत आहेत.