( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील भिम युवा पँथर या सामाजिक संघटनेतील विद्यमान अध्यक्षांसह चार जणांनी संघटनेच्या तत्त्वाला हरताळ फासून राजकीय अजेंडा हाती घेतला. याचाच ठपका ठेवून विद्यमान अध्यक्षांसह सेक्रेटरी, खजिनदार या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अन्य दोघांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. हा निर्णय रविवार दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्याध्यक्ष किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून भिमयुवा पँथर ही राजकीय भूमिका विरहित आंबेडकरी आणि बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी युवा तरूणांची लढाऊ संघटना म्हणून कार्यरत आहे. या संघटनेकडून तालुक्यातील अनेक घटनांच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली आहेत. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे. कोणता पुढारी कोणत्या पक्षाचे काम करतो किंवा कोणत्या पक्षाचा प्रचार करतो याकडे सामाजिक स्तरावर प्रत्येकजण नजर ठेवून असतो. याच पार्श्वभूमीवर भीम युवा पँथर संघटनेच्या अध्यक्षांसह अन्य चार जणांना एका राजकीय पक्षाचे काम करणे चांगलेच भोवले आहे. संघटनेच्या ध्येय धोरणांच्या विरोधात जाऊन या पदाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाचे कामकाज करत असल्याचे इतर सभासदांना निदर्शनात आले. याबाबत आंबेडकरी, बहुजन समाजातील अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. तर काही फोन रेकॉर्डिंग देखील व्हायरल करण्यात आल्या होत्या. या सर्व विषयातून आंबेडकरी समाजामध्ये खदखद, असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
समाजामध्ये आणखी बदनामी नको , तसेच संघटनेचे निरपेक्ष अस्तित्व अबाधित रहावे, या बाबींचा विचार करून राजकीय पक्षाचे कामकाज करणाऱ्या संघटनेच्या विद्यमान अध्यक्ष रविकांत पवार, सेक्रेटरी शशिकांत कांबळे, खजिनदार शरद सावंत, तुषार पवार आणि प्रितम आयरे या पाच जणांवर संघटनेकडून कठोर पावले उचलून सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संघटनेच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांनी गेली सहा वर्षे अतोनात मेहनत घेतली. मात्र राजकीय अजेंडा संघटनेचा नाही, समाजामध्ये दोन दिवसांपासून या विषयावर सर्वत्र चर्चा सुरू होती. मात्र संघटनेचे निरपेक्ष अस्तित्व अबाधित राहावे यासाठी नाईलाजाने समाज हितासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. लवकरच नवी कार्यकारणी जाहीर करण्यात येईल.
– अमोल जाधव ( भीम युवा पँथर, पदाधिकारी )